फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे भारताकडून समर्थन, मुस्लिम देशांमध्ये फ्रान्स विरोधात संतापाची भावना

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेचा भारताने निषेध केला आहे. मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतलीय त्यावरुन त्यांचा मुस्लिम देशांमध्ये निषेध सुरु आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे समर्थन केले आहे. मॅक्रॉन यांच्यावर होणारी व्यक्तीगत स्वरुपाची टीका हे आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी ज्या क्रूर पद्धतीने फ्रेंच शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला, त्याचाही परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणासाठी दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही, असेही भारताने पत्रकात म्हटले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जी भूमिका घेतलीय, त्यावरुन मुस्लिम देशांमध्ये मोठया प्रमाणावर संताप आहे. मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शने सुरु आहेत.

“राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर ज्या भाषेमध्ये व्यक्तीगत स्वरुपाचे हल्ले करण्यात येत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. काही आंतरराष्ट्रीय मानक आहेत, त्याचे हे उल्लंघन आहे. फ्रेंच शिक्षकावर ज्या क्रूर पद्धतीने दहशतवादी हल्ला करण्याता आला, त्याचाही आम्ही निषेध करतो. संपूर्ण जगाला या घटनेने हादरवून सोडले. फ्रान्सची जनता आणि त्या शिक्षकाच्या कुटुंबीयाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारत आणि फ्रान्समध्ये द्विपक्षीय संबंध बळकट आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा सहकार्य करारही झाले आहेत. भारताने फ्रान्सकडून राफेल ही अत्याधुनिक फायटर विमानेही विकत घेतली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या या स्टेटमेंटनंतर भारतातील फ्रान्सच्या राजदूतांनी भारताचे आभार मानले आहेत. दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र लढा देतील असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here