प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका – भाऊसाहेब गलांडे

671


कोल्हापूर दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था अशा शासकीय-निमशासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्था व स्थानिक पोलीस यंत्रणा यांनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही व अशा प्रकारांना आळा बसेल याची दक्षता घेण्याचे आवाहन श्री. गलांडे यांनी केले आहे. तसेच समारंभानंतर रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेले राष्ट्रध्वज योग्य तो मान राखून ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन समारंभ जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांमार्फत ध्वजारोहणाने साजरा होणार आहे. राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरिता नागरिकांकडून वैयक्तिकरित्या छोट्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकण्यात आल्याचे दिसून येते. रस्त्यात पडलेले व विखुरलेले राष्ट्रध्वज प्लॉस्टिकचे असतील तर बरेच दिवस नष्ट होत नसल्याने ते त्याच ठिकाणी पडलेले आढळतात. ही बाब राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने गंभीर असल्याने राष्ट्र ध्वजाकरिता प्लॉस्टिकच्या वापरास मान्यता नाही. कागदी ध्वजाचा वापर करताना योग्य तो मान राखणे आवश्यक आहे. तसेच असे राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देवू नये. ते खराब झाले असल्यास ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्यात यावेत, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाण्यासंदर्भात शासनाच्या वतीने वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 कलम 2 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. गलांडे यांनी स्पष्ट केले आहे.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here