पुण्यात ही शस्त्रे येणार गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या टोळीला अटक केली
पुणे : पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पुणे हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांकडून 18 गावठी पिस्तुलं आणि 27 जिवंत काडतूसं हस्तगत केली. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 4 आरोपी हे शिरूर परिसरातले आहेत. या सर्वांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
पुण्यात ही शस्त्रे येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या टोळीला अटक केली.
अरबाज खान, सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड उर्फ जय, विकास भगत तौर उर्फ महाराज व शरद बन्सी मल्लाव अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 18 पिस्तुलं, 27 जिवंत काडतुसे, एक चोरीची मोटार सायकल असा एकूण मिळून 5 लाख 68 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. हडपसर पोलिसांची शहर आयुक्तालयातील मोठी कारवाई आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेले गावठी बनावटीचे पिस्तुलं व जिवंत काडतुसे यामुळे पुणे शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. या आरोपीकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
यातील अनेक आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी एवढा मोठा शस्त्रसाठा कशाला आणला होता? कोणाला दिला जाणार होता? की काही घातपात करायचा होता याचा तपास हडपसर पोलीस करत आहेत.