पुणे : 5 कोटींचे सव्वासहा हजार टॅब गेले कोठे?

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी आता ‘सीएसआर’चा फंडा

पुणे – महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना टॅब किंवा अन्य मोबाइल वगैरे साधने नसल्याचे शिक्षण मंडळाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. यामुळेच मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असल्याचे सांगून “सीएसआर’च्या माध्यमातून या सुविधा उपलब्ध करत असल्याबद्दलही सांगण्यात येत आहेत. मात्र, चार वर्षांपूर्वी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेले टॅब गेले कोठे? हा प्रश्‍न आता या निमित्ताने पडला आहे.

महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2016 मध्ये तब्बल पाच कोटी रुपये खर्चून 6 हजार 299 टॅब विकत घेण्यात आले होते. हे टॅब शाळेतच ठेवून वापरण्यात येत होते. असे असताना टॅबची खरेदी केली असताना आता महापालिका शाळांसाठी पुन्हा टॅब खरेदी कशासाठी? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

त्यावेळी जे टॅब खरेदी केले, ते माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आताही देऊ शकतो. ते कोणत्या शाळेत किती दिले याची नोंद शिक्षणमंडळात आहे. त्यातील किती टॅब दुरुस्त अवस्थेत आहेत आणि किती नादुरुस्त आहेत, याची माहिती प्रशासनाने दिली पाहिजे.

एकूण टॅबमधील जे नादुरुस्त असतील ते संबंधित कंपनीच्या लोकांना बोलावून दुरुस्त होऊ शकतात. मुळात हे टॅब विद्यार्थ्यांना घरी वापरण्यासाठी देण्यात आले नव्हते. विद्यार्थ्यांनी “टेक्‍नॉलॉजी फ्रेंडली’ व्हावे यासाठी हे टॅब देण्यात आले होते. शाळेतच वापरून ते जाताना शिक्षकांकडे जमा करणे अपेक्षित होते.

शाळाप्रमुखांकडे ते असतील तर त्याची यादी त्यांच्याकडून मागून घेऊन, त्यातील काही गहाळ झाले असतील किंवा काही नादुरुस्त झाले असतील तर प्रशासनाने ते पाहावे, असे नगरसेवक अश्‍विनी कदम यांनी म्हटले आहे.

यापूर्वी दिलेल्या टॅबमधील काही गायब झाले असतील, तर ती जबाबदारी त्या शाळाप्रमुखांची आहे. टॅब सांभाळून ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे होते. आता, त्यांच्याकडून ते वसूल करून घेणे आवश्‍यक आहे. तर आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी आमच्याकडे साधनच उपलब्ध नाही, अशी ओरड शिक्षणमंडळाकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here