औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका) : कन्नड तालुक्यातील देवगाव (रं) बृ.ल.पा. प्रकल्पांतर्गत बाधित गावठाण कानडगावातील अकरा ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात अग्रीम मावेजाचे धनादेश उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला ग्रामस्थांना पुनर्वसनाचा अग्रीम मावेजा देण्यात येत असल्याने त्यांचा आनंद होत आहे, असे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले. पालकमंत्री देसाई यांनी कानडगावच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेऊन जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांना सूचना केल्या होत्या. आमदार अंबादास दानवे आणि कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी या कामाबाबत पाठपुरावा करून ग्रामस्थांना अग्रीम मावेजा देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीनेही मंत्री देसाई, श्री. दानवे, श्री. राजपूत यांचे आभार मानण्यात आले.
कन्नडचे आमदार राजपूत यांनी पालकमंत्री देसाई, आमदार दानवे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे आदींचे आभार मानले. आमदार दानवे यांनीही मागील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला कानडगाव पुनवर्सनाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच जिल्हा प्रशासनासह शासनाचे आभार मानले व उर्वरीत सर्व ग्रामस्थांनाही मावेजा लवकरच देण्यात येणार असल्याचे श्री. दानवे म्हणाले.
पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मावेजा देण्यात आलेल्या ग्रामस्थांमध्ये गजानन नांगुर्डे, सर्जेराव नांगुर्डे, सोपान भोसले, कारभारी सावडे, संदीप नांगुर्डे, बाबासाहेब भोसले, अशोक नांगुर्डे, देविदास नांगुडे, नंदू नांगुर्डे, नारायण नांगुर्डे, शिवाजी काळे आदींना अग्रीम मावेजा प्रदान करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गोडसे, श्री. अश्फाक, श्री. वाकचोरे, वसंत जाटाळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपअभियंता जयवंत गायकवाड यांनी केले.