
अहिल्यानगर-शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सिताराम सारडा विद्यालय परिसरात विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने दुसऱ्या विद्यार्थ्याने खून केल्याची धक्कादायक घटना दुपारी घडली. अफान मुस्तकीर शेख असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
त्याचा खून करणारा विद्यार्थी त्याच विद्यालयात शिक्षण घेत असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्या दोन विद्यार्थ्यांमध्ये यापूर्वी वाद झाले असल्याची माहिती आहे. बुधवारी दुपारी ते दोघे विद्यालयात असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि एकाने दुसऱ्यावर शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अफान शेख याला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खूनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून परिसरात तणावपूर्व शांतता आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी याच शाळेत मुख्याध्यापक असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. मुले व्यसनाधीन होऊ नयेत, म्हणून शाळेच्या जवळ गुटखा, तंबाखू विक्री नसावी असावी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी तक्रार करून टपरी हटवायला लावली होती. त्याच रागातून त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्याच शाळेत आज एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचा खून केला.