नगर ब्रेकिंग : नवीन करोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. यामध्ये अहमदनगर शहरात ७ ते २२ डिसेंबर या काळात ११ जण आल्याची माहिती महापालिकेला मिळाली आहे. नियमानुसार त्यांची तपासणी आणि पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
मागीलवेळी मार्च महिन्यात अहमदनगर येथे करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. पुण्यानंतर नगरमध्ये करोनाचा रुग्ण आढळून आला होता. दुबईहून विमानप्रवास करून आलेला हा रुग्ण होता. त्या पार्श्वभूमीवर आता नव्या करोना विषाणूला आळा घालण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. राज्य सरकारने ब्रिटन येथून आलेल्या प्रवाशांची माहिती संकलित करून त्या त्या शहारांना पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नगरमधील हे प्रवासी ७, ९, १२, १४, २१ आणि २२ डिसेंबरला नगरला परत आलेले आहेत. पाच वेगवेगळ्या कुटुंबातील या व्यक्ती असून, त्यांची करोना चाचणी होणार असल्याचे अहमदनगर महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले. मार्केट यार्डमधील २, कराचीवाला नगरमधील ४, गुलमोहोर रोडवरील ३, पाइपलाइन रोड व नवनागापूर येथील प्रत्येकी १ अशा ११ जणांचा यात समावेश आहे.
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले की, या ११ जणांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात येईल. या चाचणीमध्ये जर कोणी बाधित आढळले तर त्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळा येथे पाठविले जातील. तपासणीत ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल, त्यांचा नियमानुसार पुढील २८ दिवस पाठपुरावा केला जाईल. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर पाचव्या आणि दहाव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल असेही डॉ. बोरगे यांनी सांगितले.
दरम्यान, नगर जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती ब्रिटन येथून आल्याचे समोर आले आहे. यापैकी एक श्रीगोंदा व एक संगमनेर येथील आहे. त्यामुळे ब्रिटनमधून नगर जिल्ह्यात आलेल्या एकूण प्रवाशांची संख्या आता १३ झाली आहे.