दुधात भेसळ करण्यासाठीच्या पावडरचा मोठा साठा पकडला
नगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
नगर – दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हे पावडरचा मोठा साठा नगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने उंबरे, ता. राहुरी येथे पकडला असून सुमारे २ लाख ६४ हजार ४१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या माहीतीच्या आधारे उंबरे, ता. राहुरी येथील मे. मळगंगा मिल्क एन्ड मिल्क प्रॉडक्टस, येथे या पथकाने तपासणी केली असता सदर ठिकाणी व्हे पावडर ( मिल्की मिस्ट छाप) च्या प्रत्येकी 25 किलोच्या 96 गोण्या व व्हे पावडर ( अमुल छाप) प्रत्येकी 25 किलोच्या 16 गोण्या गावापासुन दुर असलेल्या शेतामधील एका शेडमध्ये विनापरवाना साठविलेल्या असल्याच्या आढळुन आल्या. सदर साठ्याबाबत मालक राजेंद्र नामदेव ढोकणे याने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. श्री. ढोकणे यांनी विक्री बाबतचा तपशिलही दिला नाही. सदर व्हे पावडर ही दुधामध्ये भेसळ करण्यासाठी साठविलेली असल्याच्या संशयावरुन अन्न नमुने घेवुन उर्वरीत साठा 2796 किलो, किंमत २ लाख ६४ हजार ४१६ रुपये असा मुद्देमाल जप्त व सिल केलेला आहे. सदर व्हे पावडरचा पुरवठादार व खरेदीदार यांच्याकडेही चौकशी करण्यात येत आहे. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे नाशिक विभाग सह आयुक्त सी. डी. साळुखे, नगरचे सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी केलेली आहे. सदरच्या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार यांनी सहाय्य केले आहे.