दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून संपवले; पत्नीसह तिघांना अटक

    दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून संपवले; पत्नीसह तिघांना अटक

    Satara News : सातारा तालुक्यातील सैदापूर येथील जवानाचा खून दारु पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरुन पत्नी, भावजय व मेहुण्यानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पत्नी चेतना संदीप पवार (वय ३५, रा. सैदापूर), भावजय सुषमा राहुल पवार (वय ३८, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) व मेहुणा सोमनाथ भरत अंबवले (रा. खोलेवाडी, ता. वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    संदीप पवार हे सैन्य दलात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर घरी आले होते. दि. २७ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना अनोळखी व्यक्तीने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे सांगत पत्नी व नातेवाईकांनी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

    शवविच्छेदन अहवालात त्यांना गंभीर जखमा असल्याचे समोर आले. त्यानुसार पत्नी चेतना यांची फिर्याद घेऊन वानवडी पोलिसांनी अनोळखी व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा तपासासाठी तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता.

    पोलिसांनी गोपनीयरित्या काढली माहिती

    सैनिकाचा खून झाल्याची घटना गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केले. या पथकाने संदीप यांच्या घरी जावून नातेवाइकांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आली. त्यामुळे पोलिसांनी गोपनीयरित्या परिसरातील लोकांकडून माहिती काढली. त्यानंतर नातेवाइकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

    संशय नको म्हणून पुण्याला हलवले

    पोलिसांच्या चौकशीमध्ये पत्नी, भावजय व मेहुण्यानेच संदीप यांचा खून केल्याचे समोर आले. संदीप हे सुट्टीवर घरी आल्यापासून दारु पिऊन घरातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करुन त्रास देत होते. त्यामुळे आम्ही घरातील लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली, तसेच पोलिसांचा आमच्यावर संशय येऊ नये, म्हणून त्यांना सातार्‍यातील रुग्णालयाऐवजी पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे व त्यांना अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची फिर्याद दिल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले आहे.

    पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार ज्योतिराम बर्गे, हवालदार आतिष घाडगे, संजय शिर्वेâ, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, संतोष पवार, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, अजित कर्णे, नीलेश काटकर, सचिन सासणे, रोहित निकम, संजय जाधव व वैभव सावंत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here