कराड – येथील चित्रकार डॉ. राजेंद्र कंटक यांच्या पोट्रेट पेंटिग्जची इंडिया रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली असून त्यांना संबंधित संस्थेने तसे अधिकृतरित्या कळविले आहे. पोट्रेट पेटिंग्जसाठी डॉ. कंटक यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या “भावमुद्रा’ हा विषय घेतला होता. ठाकरे यांची तब्बल 101 स्केचेस त्यांनी रेखाटली आहेत.
एकाच व्यक्तीच्या भावमुद्रा इतक्या मोठ्या प्रमाणात रेखाटणे, हा एक विक्रम मानला गेल्याने त्याची इंडिया रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. डॉ. कंटक हे हौशी चित्रकार असून त्यांनी वैविध्यपूर्ण चित्रांच्या माध्यमातून आपला छंद जोपासला आहे. या विक्रमाची नोंद या आधी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्येही झाली आहे. या चित्रांचे प्रदर्शन अलीकडेच कराड शहरात भरवण्यात आले होते. त्याला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या आधी गणेशाची 108 रूपे, सर्वांत लहान कॅलेंडर, सर्वांत लहान भगवद्गीता, अशा उपक्रमांचीही विक्रम म्हणून नोंद झाली आहे. या क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. कंटक यांना विविध संस्थांच्या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.