डॉ. के. के. अग्रवाल यांचा कोव्हिड-19 च्या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मृत्यू का झाला?
सरोज सिंह
पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आलेले देशातले सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. के. अग्रवाल यांचं सोमवारी निधन झालं. त्यांना कोरोना संसर्ग झाला होता आणि दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मात्र, कोरोनाविरोधातली ही लढाई ते हरले आणि सोमवारी त्यांचं निधन झालं. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि दुसरा डोस घेऊन 15 दिवसही झाले होते आणि तरीही त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्याचा शेवट इतका दुःखद झाला.
देशात कोरोनावर सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी उपलब्ध आहेत. स्पुटनिक V लवकरच उपलब्ध होईल.
एकमेव उपाय – लस
चर्चा पुढे नेण्याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा सध्या एकमेव प्रभावी उपाय असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. लशीप्रती शंका निर्माण करणं, हा या रिपोर्टचा उद्देश नाही. तर लस घेतल्यानंतरही खबरदारीच्या सर्व उपायांचं पालन करणं गरजेचं आहे, हा या रिपोर्टचा हेतू आहे.
कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं?
कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी लस घेता येते?
मासिक पाळी आली असताना कोरोना लस घेऊ शकता का?
कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकार आणि लस निर्मात्यांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार लसीचे दोन डोझ घेतल्यानंतर 15 दिवसांनी कोरोनाचा संसर्ग झाला तर हॉस्पिटलमध्ये जाण्याची, आयसीयू किंवा व्हेंटिलेटरची गरज भासत नाही.
कोरोना लस
फोटो स्रोत, ADRIANA DUDULEANU / EYEEM
गेल्या महिन्यापर्यंत सरकारसुद्धा मृत्यू टाळण्यासाठी लस हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत होतं.
कोव्हिशिल्ड लस निर्मात्या अॅस्ट्राझेनकाच्या वेबसाईटवरही, “लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये लस कोव्हिड-19 आजाराचा गंभीर संसर्ग, हॉस्पिटलमध्ये भर्ती होणे आणि मृत्यूपासून 100% बचाव करत असल्याचं आढळून आलं आहे”, असा दावा करण्यात आला आहे.
आणि म्हणूनच लस घेतल्यानंतरही कोव्हिड संसर्ग होणारेही लसीचं समर्थन करत होते.
लस घेतल्यानंतर मृत्यू
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनामुळे मृत्यू झालेले डॉ. के. के. अग्रवाल एकटे नाहीत.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 269 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यापैकी किती डॉक्टर्सने कोरोनाचे दोन्ही डोस घेतले होते, याची माहिती देण्यात आलेली नाही.
अॅस्ट्राझेनिका
फोटो स्रोत, ASTRAZENICA
इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्र सरकारने 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्राधान्य देण्यात आलं.
त्यामुळे बहुतांश आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लशीचे दोन्ही डोस दिले गेले असावे, असं मानूया.
केंद्र सरकारचं म्हणणं
त्यामुळे लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मृत्यूची शक्यता आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय.
भारतात आतापर्यंत असे किती मृत्यू झाले आहेत? मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हाच प्रश्न विचारण्यात आला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, “लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होतो. लस इफिकसीच्या डेटावरूनही लक्षात येतं. देशात अशी प्रकरणं अगदी मोजकी आहेत. आयसीएमआरने यापूर्वी अशाप्रकारच्या संसर्गाचा डेटा जाहीर केला आहे.”