टिकटॉकवरील बंदी “या’ देशाने हटवली

कराची – करोनाव्हायरस जगभर पसरवल्याचे कारण देत, अनेक देशांनी चीनी मालावर बहिष्कार घातला. तसेच अँड्रॉईड मोबाईलमधील चीनी ऍप्सवरही अनेकांनी बंदी घातली, याचा सर्वाधिक फटका टिकटॉक या व्हिडीओ ऍपला बसला होता. मात्र, चीनचा मित्र असलेल्या पाकिस्तानने अशी कोणतीही बंदी चीनी वस्तूंवर लादली नव्हती. मात्र, दहा दिवसांपूर्वी पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य प्रसिद्ध झाल्याचे कारण देत पाक सरकारने चीनी ऍप टिकटॉकवर बंदी घातली होती. मात्र, पुन्हा असे होणार नाही, असे गुळमुळीत आश्‍वासन कंपनीने दिल्यानंतर पाक सरकारने ही बंदी उठवली आहे.
नुकतीच दूरसंचार प्राधिकरणाने (पीटीए) व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभर नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या ऍपवर आक्षेपार्ह आणि अश्‍लील अशा अनैतिक पोस्टस प्रकाशित होत होत्या. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याविषयी बदनामीकारक मजकूरही प्रसिद्ध होत असल्याचे पाहून पाक सरकारने टिकटॉकवर 9 ऑक्‍टोबरला बंदी घातली होती.
एका ट्‌वीटमध्ये पीटीएने म्हटले आहे की, अश्‍लीलता आणि अनैतिक सामग्री पसरविणारी सर्व खाती बंद केली जातील आणि स्थानिक कायद्याच्या आधारे ती सामग्री नियंत्रित केली जाईल. यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने अश्‍लील आणि आक्षेपार्ह पोस्टबद्दल सर्वतोपरी काळजी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर टिकटॉकवरील बंदी उठवण्यात आली आहे.
जुलैमध्ये देशातील दूरसंचार नियामकाने चिनी ऍपच्या आक्षेपार्ह सामग्रीविरूद्ध “अंतिम चेतावणी’ दिली होती. मात्र, तरिही कंपनीने सदर चेतावणीकडे लक्ष न दिल्याने समाज माध्यमांत गोंधळाचे वातावरण निर्माण होत होते. त्यामुळे टिकटॉकवर नाईलाजाने बंदी घालावी लागली होती, असे एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. आता तरुणाई पुन्हा टिकटॉकवर व्यस्त झाली असली, तरी अशा वादग्रस्त पोस्ट रोखणारे नियामक मंडळ अधिकच सतर्क झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here