जुगारात जिंकलेल्या २५ हजारांनी केला घात! आठ वर्षांनी झाला उलगडा!
‘तो’ एक माथाडी कामगार. मात्र दुर्दैवाने त्याला जुगाराचा नाद लागला आणि त्यात जिंकलेल्या २५ रुपयांच्या वादातून आरोपीने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन वेळा तपास बंद केल्यानंतर तिसऱ्यांदा आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय.
आनंदा बाबुराव सुकाळे असे मयत व्यक्तीचे नाव होते. दशरथ विठ्ठल कांबळे या आरोपीने हा केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दि. २९ डिसेंबर २०१२ रोजी तुर्भे येथील एसटी स्थानकाजवळ निर्जनस्थळी एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना त्याच्याकडे काही वस्तू आढळून आल्याने त्याची ओळख पटली होती.
शवविच्छेदनमध्ये त्याच्या डोक्यावर जड वस्तू मारल्याने रक्तस्त्राव झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाले होते. मात्र आरोपी फरार होता. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बीजी शेखर पाटील यांनी आव्हान म्हणून हा तपास सुरू केला.
यासाठी उपायुक्त प्रवीण कुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, गिरीधर गोरे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे पथक नेमण्यात आले होते.
तपासात आरोपी कांबळे याच्याबाबत काही माहिती हाती आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबुल केला. त्यामुळे गुन्हेगार कितीही चतुर असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही, हे या तपासावरून स्पष्ट होते.