छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे राष्ट्र निर्माण कार्यात उत्तम काम – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

700

औरंगाबाद, दिनांक 31 (जिमाका) : राष्ट्र निर्माण कार्यात छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ चांगले कार्य करत आहे. मंडळ तरुण पिढी उत्तम प्रकारे घडवत असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचे लक्ष्मणराव मोहिते ग्रंथालय नामकरण आणि बाबुराव औराळकर इनडोअर क्रीडांगनाचे उद्घाटन, औराळकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण श्री.थोरात यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कन्नड नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, डॉ.कल्याण काळे, सरस्वती भुवन प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा उद्योजक राम भोगले, छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानसिंह पवार, बाबासाहेब मोहिते, अनिल पटेल, नामदेव पवार, किशोर पाटील, अशोक आहेर, पी. के.निकम, चंद्रकांत देशमुख, डॉ.डी.डी.शिंदे, डॉ.ए. के. महाले, कृष्णराव पाटील निकम, लक्ष्मणराव देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पिढीने चांगला शिक्षित समाज घडविण्यासाठी पुढाकार घेतला. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण या राज्य नेतृत्वाला साथ दिली, विभागाचा विकास मोठ्याप्रमाणात केला. त्यातील महत्त्वपूर्ण समाजधुरिणांमध्ये लोकनेते बाळासाहेब पवार, बाबुराव औराळकर, लक्ष्मणराव मोहिते, नारायणराव नागदकर, रफिक झकेरिया,बाबुराव काळे, विनायक पाटील, माणिकराव पालोदकर यांच्या कार्याची आठवण येते. त्यांच्यामुळे या भागाचा विकास होण्यास मदत झाली. आपल्या भागातील युवक केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले, असेही ते म्हणाले. बाबुराव औराळकर यांच्यावरील ग्रंथाचे विमोचनही थोरात यांच्याहस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसिंह पवार यांनी केले. यात महाविद्यालतील सुविधांबाबत सांगितले.

श्री.काळे, किशोर पाटील, श्री.भोगले यांनीही ग्रामीण भागातील शैक्षणिक विकास यावर विचार मांडले. कन्नड तालुक्याचा अधिकाधिक विकास व्हावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन डॉ. के. एल.भानूसे, आभार प्राचार्य विजय भोसले यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here