कोविड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना लवकरात लवकर दुसरा डोस उपलब्ध करुन द्यावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

494

कोविड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना
लवकरात लवकर दुसरा डोस उपलब्ध करुन द्यावा
-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दुसरा डोस उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

जिल्हा कृतीदल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळी, सीपीआरचे प्र.अधिष्ठाता डॉ.सुधीर सरवदे, महानगरपालिकेचे उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुक देसाई, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, महानगरपालिकेचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील लसीकरणाच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यात उपलब्ध लसींपैकी 80 टक्के लसी दुसऱ्या डोससाठी तर 20 टक्के पहिल्या डोससाठी वापरण्यात याव्यात. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे, यासाठी आरोग्य विभागामार्फत गरोदर महिलांच्या लसीकरणाबाबत जनजागृती करुन गरोदर मातांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रवृत्त करा. अंथरुणाला खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या गावामध्ये लसीकरण सत्र आयोजित करुन लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, अशा सूचना केल्या. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क करुन आपला दुसरा डोस वेळेत घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात 60 वर्षावरील वयोगटातील 82 टक्के नागरिकांचा पहिला डोस तर 59 टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. तसेच 45 वर्षावरील वयोगटातील 74 टक्के नागरिकांचा पहिला डोस तर 51 टक्के नागरिकांचा दुसरा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती देवून 45 वर्षावरील कोविड लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी सांगितले.
0000000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here