- आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज
- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
- अहमदनगर: जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करणे आणि बाधित रुग्णांचे होम आयसोलेशन बंद करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने करावी, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केल्या. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांसाठी आवश्यक असणारा ऑक्सीजन पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
- महसूलमंत्री श्री. थोरात यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह विविध अधिकारी यावेळीउपस्थित होते.
- यावेळी श्री. थोरात यांनी, कोरोनासंदर्भातील सद्यस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या, कोणत्या भागात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे, कोविड केअर सेंटर आणि तेथील परिस्थिती, कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी यासंदर्भात त्यांनी तपशीलवार आढावा घेतला. नाशिक आणि विरार येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांनी त्यांची व्यवस्था अधिक चांगली असेल आणि रुग्णांना तेथे अडचणी जाणवणार नाहीत, याकडे लक्ष देण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष पुरवावे, अशी सूचना केली.
- कोरोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असून यामध्ये कोणत्याही स्वरुपाचे मतभेद येता कामा नयेत. सर्वच लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, प्रशासन यांनी हातात हात घालून या कोरोना विरुध्दची लढाई जिंकली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यातच ऑक्सीजन उपलब्धतेबाबत अडचणी होत्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न युद्धस्तरावर सुरु आहे, जिल्ह्यासाठी जेथून मिळेल तिथून पुरेशा प्रमाणात आपल्याला लागणारा ऑक्सीजन मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जिल्ह्यातील काही प्लान्टमधून ऑक्सीजन निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील काळात अडचणी कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखली आणि आपण संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. सध्या होम आयसोलेशनमध्ये राहणारे रुग्ण कोरोना संसर्ग वाढीला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. असे रुग्ण त्यांच्या कुटुंबाला आणि परिसरातही संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे होम आयसोलेशन अगदी कडकपणे बंद केले गेले पाहिजे. त्यानंतर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनाही लवकरात लवकर शोधून त्यांच्या चाचण्या केल्या जाणे आवश्यक आहे. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच अशा व्यक्ती आपण शोधू शकलो आणि त्यांना प्राथमिक स्तरावरच उपचार करु शकलो तर रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे नंतर गंभीर अवस्थेत येणाऱ्या रुग्णासाठी लागणाऱ्या ऑक्सीजन त्या रुग्णांसाठीच वापरता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, आपण ऑक्सीजन उपलब्धतेसंदर्भात जिल्ह्याची निकड, भौगौलिक परिस्थिती लक्षात घेऊन जास्तीचा पुरवठा व्हावा, यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांशी बोललो असल्याचे ते म्हणाले.
- आरोग्यासंदर्भात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आता उभारावे लागणार आहे. आता आमदार निधीतून प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याचा निर्णय झालाआहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी त्या रकमेतून या सुविधांचे बळकटीकरण करता येईल. तसेच, चांगल्या आरोग्य उपचारांसाठी ससूनच्या धर्तीवर मोठे हॉस्पिटल जिल्ह्यात असावे यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले.
- सध्या जिल्ह्यात तसेत राज्यात लसीकरण मोहिम राबविली जात आहेत. आपल्या राज्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन दिल्यास आपण वेगाने अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करु शकतो. मात्र, केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लस सध्या येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि राज्याची सध्याची मागणी व गरज यामध्ये तफावत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक रेमडेसीवीरची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
- ‘एमआयडीसी’तील ऑक्सीजन निर्मिती प्लान्टला भेट
- एमआयडीसीतील ऑक्सीजन निर्मिती प्लान्टला भेट देऊन तेथे महसूलमंत्री श्री. थोरात यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून दैनंदिन ५ टन ऑक्सीजन निर्मिती होत असल्याने आता काहीसा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. जि.प. उपाध्यक्ष शेळके यांची सांत्वनपर भेट
- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर श्री. थोरात यांनी आज श्री. प्रताप शेळके आणि त्यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. *****