कावड यात्राः पालखी मंडळांनी समिती तयार करुन प्रशासनासोबत नियोजन करा-पालकमंत्री ना. कडू

504

अकोला,दि.१४(जिमाका)- राज्यातील कोविड निर्बंधांची स्थिती पाहता व येत्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे अनुमान पाहता अकोला येथील राजराजेश्वराच्या कावड पालखी सोहळ्याचे आयोजन करण्याबाबत पालखी मंडळांनी निवडक लोकांची एक समिती तयार करावी व या समितीच्या सदस्यांनी प्रशासनाशी चर्चा करुन नियोजन करावे,असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज पालखी कावड यात्रा मंडळांच्या सदस्यांना केले.

येथील जिल्हा नियोजन भवनाच्या यंदाच्या राजराजेश्वर मंदिर पालखी च्या कावड यात्रासोहळ्याच्या आयोजनाबाबत सर्वमान्य उपाय शोधता यावा यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस विधान परिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व पोलीस अधिकारी तसेच सर्व मंडळांचे पदाधिकारी, शिवभक्त उपस्थित होते.
यावेळी मंडळांच्या वतीने काही सुचना मांडण्यात आल्या. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनीही काही सुचना मांडल्या. याबाबत पालकमंत्री ना. कडू म्हणाले की, याबाबत मंडळांच्या सदस्यांपैकी निवडक सदस्यांची एक समिती तयार करुन या समितीने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन पालखी सोहळ्याचे आयोजन कोविड परिस्थिती लक्षात घेऊन कसे करता येईल, याबाबत नियोजन करावे. त्याचे पालन सर्वांनी करावे. जलाभिषेकाची परंपरा कायम अखंडीत राखून कसे नियोजन करावे हे येत्या मंगळवारी(दि.१७) बैठकीत नक्की करावे,असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here