ओतूरमधील शाळेच्या वर्गखोल्या जमीनदोस्त

ओतूर -ओतूर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1च्या सुस्थितीत असलेल्या मुलांच्या शाळेतील वर्ग खोल्या पाडून त्यांच्या जुन्या सागवान लाकूड व घडीव दगडाची विक्री करताना जाहीर निविदा न देता विक्री केली आहे. इमारतीचे साहित्य विक्री करताना शासकीय नियमांची पायमल्ली संबंधितांकडून करण्यात आली असल्याचा आरोप ओतूरकरांनी केली आहे.

या खोल्या पाडतेवेळी या परिसरातील मोठ-मोठ्या जुन्या वृक्षतोड करून त्यांची विल्हेवाटही लावण्यात आली. सुस्थितीत असलेल्या जुन्या घडीव दगडाच्या खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या. आपल्या साक्षिने अनेकांचे यशस्वी जीवन घडविलेल्या व या शाळेकडे बघून विद्यार्थ्यांच्या आठवणींना नेहमीच उजाळा मिळून स्फूर्ती देणाऱ्या तसेच एका सुसंस्कृत इतिहासाची साक्ष देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचे ब्रिटीश कालीन बांधकाम पाडणे खरच आवश्‍य होते का? असा सवाल माजी विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

या पाडलेल्या वर्ग खोल्यांचे जुने सागवान लाकूड व घडीव दगडी आदी साहित्य कोणतीही निविदा न देता मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीने मनमानी करून या साहित्याची विक्री केली आहे. जाहीर नोटीस देऊन या साहित्यांची विक्री केली असती तर आता कवडीमोल भावात विक्री झालेले साहित्यांची जास्तीत जास्त रक्‍कम मिळून शासनाच्या तिजोरीत जमा झाली असती; मात्र या विक्री प्रक्रीयेत कोणाची काय भूमिका आहे? ही देखील अंतर्गत चर्चा ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांच्यातून होत आहे.

बांधकाम पाडलेल्या शाळेच्या साहित्याची नियमाला धरून विक्री न करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. हे साहित्य शाळेत जमा करून निविदाद्वारे लिलाव करण्यात यावा, अशी मागणी जोर धरीत आहेत. तर याबाबत संबंधित विभागाच्या अध्यक्ष, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार आदींना निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ओतूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्र.1 या शाळेचे बांधकाम पाडल्यानंतर त्यामध्ये निघालेले दगड, कौले, लाकडे आदी साहित्यांची मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीने जाहीर निविदाद्वारे लिलाव करून विक्री करणे आवश्‍यक होते; मात्र तसे न करता कोटेशन पद्धतीने या साहित्याची विक्री केली असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे. याबाबत चौकशी करणार आहे.
-के. बी. खोडदे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, जुन्नर पंचायत समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here