एक इंचही जमीन शत्रुला देणार नाही

दार्जिलिंग – भारत आणि चीनदरम्यान सीमारेषेवरुन वाद अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा वाद सुटावा अशी आमचीही इच्छा आहे. पण आपल्या अवास्तव लष्करी आणि साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेने जर कोणी आमच्या देशात घुसखोरी करु पाहील, तर आमचे शूर भारतीय सैनिक एक इंचही जमीन शत्रुराष्ट्राला घेऊ देणार नाहीत, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरुन बुलंद टणत्कार केला आहे.
आज रविवारी राजनाथ सिंह यांनी विजयादशमीच्या निमित्ताने दार्जिलिंगमधील 33 बटालियनच्या सुकना युद्ध स्मारकात शस्त्र पूजन केले. त्यावेळी ते बोलत होते. रविवारी सकाळी त्यांनी नाथू ला पास येथे येऊन सैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे देखील उपस्थित होते.
चीनसोबतचा सीमावादावर सुरू असलेला तणाव संपला पाहिले अशी भारताची इच्छा असल्याचे सांगून राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, या भागात शांती कायम रहाणे गरजेचे आहे. पण कोणी सीमेचे उल्लंघन केले तर आपले भारतीय सैन्य आपल्या जमिनाचा एक इंचाही भाग कोणाला देणार नाही, असा मला विश्वास आहे. भारतीय सेनेच्या जवानांशी भेट घेतल्याने मला खूप आनंद होते. त्यांचे मनोबल उंचावले गेले आहे. त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर जे काही झाले आणि आपल्या जवानांनी ज्याप्रकारे शौर्याने प्रत्युत्तर दिले, इतिहासकार आपल्या जवानांची ती वीरता आणि साहस सुवर्ण अक्षरात लिहितील. असेही त्यांनी सांगितले.
15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैन्यामध्ये हिंसक झडप झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 7 वेळा चर्चा झाली आहे. लडाखमध्ये चिनी सैन्याशी लढा देण्यासाठी भारताने सुमारे 60,000 सैनिक तैनात केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here