ठाण्याच्या भिवंडीमध्ये उत्तर प्रदेशातून आलेले अनेकजण राहतात. यातले बहुतांश लोक हे यंत्रमागावर काम करतात. या सर्वांमधून उत्तरप्रदेशमध्ये बँक लुटणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकातल्या पोलीस नाईक विक्रांत कांबळे यांनी त्यांच्या खबऱ्यांमार्फत या आरोपीचा शोध घेतला.
उत्तर प्रदेश येथील महाराजगंज भागात एक खासगी बँक आहे. सुमारे वर्षभरापूर्वी या बँकेत चार जणांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून १३ लाख २० हजार रुपये चोरी केले होते. याप्रकरणी फरेंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशमधील एका खासगी बँकेत शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून १३ लाख २० हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने या आरोपीला नुकतीच अटक केली आहे. सलमान अब्दुल कुटूस (२२) असे त्याचे नाव आहे. बँकेतील चोरीनंतर तो भिवंडीत वास्तव्यास होता, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपी हा ठाणे रेल्वे स्थानक परिसरात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे युनिट एकने उत्तर प्रदेश पोलिसांसोबत संयुक्त सापळा रचून सलमान कुटूसला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी त्याला पुढील तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.