संगमनेर -पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्याने कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यावर संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मंगळवारी (दि.27) होणारी सुनावणी रद्द झाली असून, पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून सम तारखेस संग केला असता, पुत्रप्राप्ती होते, असे वादग्रस्त विधान केले होते. त्याबाबत अंधश्रद्ध निर्मुलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भंवर यांनी संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात इंदुरीकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर 3 जुलै रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी सरकारी वकील लिना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली होती. न्या. कोळेकर यांनी इंदोरीकर महाराजांना 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर होत, त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाची व स्थगितीची माहिती दिली होती.
त्यानंतर पुढील सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात आली. या प्रकरणात अंनिसच्यावतीने ऍड. रंजना पगार गवांदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर इंदोरीकर महाराजांचे वकील धुमाळ यांनी हरकत घेतली होती. त्यानंतर 18 सप्टेबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण न्या. डी. एस. घुमरे यांनी अंनिसच्यावतीने दाखल केलेला अर्ज मान्य केला होता. त्यावेळी 28 ऑक्टोबरची पुढील तारीख देण्यात आली होती. मात्र ही सुनावणी मंगळवारी झाली नाही. आता ही सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.