‘मृत्यूचं खोरं’ हे शब्दच किती भयंकर आहेत! पण असं खोरं अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे. ‘डेथ व्हॅली’ असं या भागाला तिथं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या डेथ व्हॅली नॅशनल पार्कमध्ये काम करणाऱ्या ब्रँडी स्टिव्हर्टशी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, “इथं प्रचंड उष्णता आहे. राहू शकत नाही इतकी उष्णता. घरातून बाहेर पडल्यानंतर असं वाटतं की कुणीतरी आपल्या चेहऱ्यावर हेअर ड्रायर फिरवत आहे.”
16 ऑगस्ट रोजी तर या डेथ व्हॅलमध्ये 130 फॅरनहाईट म्हणजेच 54.4 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. पृथ्वीवरील सर्वात उच्चांकी तापमान म्हणून याची नोंद होऊ शकते.

जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार, सर्वात उच्चांकी तापमानाच्या नोंदीला अद्याप दुजोरा मिळाला नसला, तरी डेथ व्हॅलीत भयंकर उष्णता आहे, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची आवश्यकत नाहीय.
‘जगातील सर्वात उष्ण’ भागात घर असलेल्यांपैकी ब्रँडी स्टिव्हर्ट आहेत. ब्रँड गेल्या पाच वर्षांपासून डेथ व्हॅलीत राहाता. नॅशनल पार्कच्या संपर्क विभागात त्या काम करतात.
बीबीसीशी बोलताना ब्रँडी म्हणाल्या, “इथं खूप गरम होतं. पण तुमच्या शरीरावर घाम येत नाही. कारण ते उष्णतेनं पटकन बाष्प बनून उडून जातं. तुमच्या कपड्यांना घाम लागलेला दिसेल, पण त्वचेवर फार वेळ टिकून राहत नाही.”
“उन्हाळ्यात मी अधिकाधिक वेळ घरातच राहते. मात्र, काही लोक डोंगरावर फेरफटका मारायला जातात. कारण तिकडे या भयंकर उष्णतेपासून थोडासा दिलासा देणारं वातावरण असतं,” असं ब्रँडी सांगतात.
या वातावरणाची एकदा सवय झाली की, विशेष काही वाटत नाही, असंही त्या सांगतात. किंबहुना, 26.6 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान आल्यावर थंडी वाजायला लागते, असं त्या म्हणतात.
चहूबाजूंनी उचंच उंच डोंगररांगा
अनेक लोक नॅशनल पार्कमध्ये राहतात आणि फर्नेस क्रीकमध्ये काम करतात. इथं नुकतेच विक्रमी तापमानाची नोंद झाली. हे शहर समुद्रसपाटीपासून 280 फूट खोल असून, अरुंद तलावासारखं आहे. चहूबाजूंनी उंचच उंच डोंगररांगा आणि मधोमध हे शहर आहे.

लष्करात सेवा बजावलेल्या जॅसन सांगतात, “इराकमध्ये दोनवेळा गेलोय. जर मी इराकमध्ये राहू शकतो, तर डेथ व्हॅलीत राहूच शकतो.”
जॅसन सध्या सकाळी पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत गोल्फ कोर्समध्ये काम करतात. गोल्फ कोर्सची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या पथकात ते कार्यरत आहेत. ते सांगतात, “आता उन्हाळा सुरू झाला आहे. तर अशावेळी पहाटे चार वाजता काम करण्यास सांगितलं जातं. मात्र, इथं पहाटे चार वाजताही 100 ते 105 फॉरेनहाईट तापमानाची नोंद होते.”
“गवत कापणं हे खरंतर आमचं रोजचं काम आहे. ट्रिमिंग करणं, सुकून पडलेली झाडं उचलणं ही कामं करतो. झाडं सुकल्यानंतरही वजनदार होता आणि तुटतात. पूर्ण दिवस ही झाडं कापण्यात आणि उचलण्यातच जातो,” असं जॅसन म्हणतात.

20189 च्या ऑक्टोबर महिन्यात जॅसन या भागात आले होते. आता करत असलेलं काम त्यांना आवडतं आणि आणखी काही काळ ते इथं राहू इच्छितात. हिवाळ्यात या भयंकर उष्णतेपासून थोडी सुटका होते, असं ते म्हणतात.
पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान
डेथ व्हॅलीत 21 ऑगस्ट रोजी पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचं म्हटलं जातंय.
याआधी दोन नोंदी अशा सापडतात. एक म्हणजे फर्नेस क्रीकमध्ये 1913 साली 134 फॅरनहाईट (56.6 डिग्री सेल्सिअस) तापमान आणि दुसरी नोंद म्हणजे ट्युनिशियात 1931 साली 131 फॅरनहाईट (55 डिग्री सेल्सिअस) तापमान. मात्र, या दोन्ही नोंदींबाबत तज्ज्ञांचं अद्यापही एकमत नाहीय.
बीबीसी वेदरचे प्रतिनिधी सायमन किंग सांगतात, सध्याच्या काळात कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ आणि हवामानतज्ज्ञांना फर्नेस क्रीक आणि ट्युनिशियातल्या नोंदी खऱ्या वाटत नाहीत.
हवमानाचा अभ्यास करणारे क्रिस्टोफर बुर्ट म्हणतात, डेथ व्हॅलीत 1913 मध्ये नोंद झालेल्या तापमानाबाबत शंका व्यक्त केली जाते, याचं कारण दुसरी रिडिंग आहे. फर्नेस क्रीकमधील तापमानाची जेव्हा दुसऱ्या वेदर स्टेशनवरून नोंद केली गेली तेव्हा दोन किंवा तीन डिग्री सेल्सिअस अधिक नोंद झाली होती.

या सगळ्या गोष्टींमुळेच गेल्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी डेथ व्हॅलीत नोंदवण्यात आलेल्या तापमानाला आजवरचं पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान मानलं जातंय.
जागतिक हवामान संघटनेनं अजून स्पष्टपणे या तापमानाला दुजोरा दिलेला नाही. पण त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. जर दुजोरा दिला गेला, तर सर्वाधिक तापमानात फर्नेस क्रीक, ट्युनिशियानंतर डेथ व्हॅलीची तिसऱ्या क्रमांकाची नोंद होईल. अर्थात, पृथ्वीवरील इतरही ठिकाणी डेथ व्हॅलीपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र, वेदर स्टेशन नसल्यानं बऱ्याचदा या ठिकाणी तापमानाची नोंद होत नाही किंवा हवामानतज्ज्ञांपर्यंतही माहिती पोहोचत नाही. त्यामुळेच फर्नेस क्रीकच आतापर्यंत सर्वाधिक तापमानाचा भाग म्हणून नोंदवला गेलाय.