अत्यावश्यक व अवजड वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्ग सुरु अफवांवर विश्वास ठेवू नका -पोलीस अधीक्षक

695

सकारात्मक वृत्त

अत्यावश्यक व अवजड वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्ग सुरु
अफवांवर विश्वास ठेवू नका
-पोलीस अधीक्षक
कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : अतिवृष्टीमुळे गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेला पुणे-बंगळूर महामार्ग आज सकाळी 11 च्या सुमारास सुरू झाला. सध्या या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पूर्ण क्षमतेने हा महामार्ग अद्याप सुरू झाला नाही. नागरिकांनी, प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
सध्या या मार्गावरून अत्यावश्यक वाहनांची एकेरी वाहतूक सुरू असून यामध्ये दूध, पाणी, ऑक्सिजन, इंधन आदींचा समावेश असलेली वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेत येणारी वाहने प्रामुख्याने सोडण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. सध्या महामार्गावर दीड फूट पाणी असून सायंकाळपर्यंत हे पाणी उतरल्यानंतर चारचाकी वाहने सोडण्यात येतील मात्र महामार्गावरील पूर्ण पाणी उतरल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत दुचाकी वाहने सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून मौजे यमगर्णी जवळीलही भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याचेही श्री. बलकवडे म्हणाले.
प्रथमता कागल, गोकुळ शिरगांव, गांधीनगर, किणी आणि शिरोली येथील ट्रक टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच प्रवाशी आणि इतर वाहतुकीसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here