सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा मोठ्या थाटामाटात विवाहसिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा मोठ्या थाटामाटात विवाह
पुणे – अनाथांची माय म्हणून ओळखल्या दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा रविवारी (ता. १५) पुण्यात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. लहानपणापासून ममता बालसदन येथे वाढलेल्या या मुलींनी लग्नानंतर सासरची वाट धरली आणि उपस्थित पाहुण्यांसह सर्वांना गहिवरून आले.
यामुळे नववधूंसह उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.या सर्व मुलींना सासरी जाताना पाच हजारांहून अधिक पाहुण्यांनी निरोप दिला. मगरपट्टा सिटीतील लक्ष्मी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी या सर्व वधु-वरांना चांदीच्या ताटात भोजन दिले.
यामुळे दिवंगत सिंधूताई यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. ममता बाल सदनमधील माझ्या सर्व लेकींचा विवाह सोहळा थाटात पार पडला पाहिजे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत, असे सिंधूताई सपकाळ यांचे स्वप्न होते.या नवविवाहित दांपत्यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अभिनेते भारत गणेशपुरे, मी सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटात सिंधूताईंची भूमिका केलेल्या तेजस्विनी पंडित, प्रसाद ओक, विजय कदम, मकरंद अनासपुरे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सिंदुताईंच्या या लेकींना नवीन संसाराकरिता शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
या विवाह समारंभासाठी ममता बाल सदनसह सन्मती बाल निकेतन मांजरी, मनःशांती छात्रालय शिरूर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, गोपिका गायरक्षण केंद्र माळेगाव ठेका, जिल्हा वर्धा. गोपाल देशी गोशाळा कुंभारवळण, पूजा जैन यांनी परिश्रम घेतले.
विलु पूनावाला फाऊंडेशनच्यावतीने या सर्व मुलींना प्रत्येकी १ लाख रुपयाचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी नारंग यांच्या हस्ते देण्यात आला.