वडूज : मायणी (ता.खटाव) येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी प्रकरणी आमदार जयकुमार गोरे त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, शैलजा साळुंखे या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केले.
मायणीच्या छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाचा वाद कोल्हापूर येथील धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात न्यायप्रविष्ट असताना सातार्यातून प्रसिद्ध होणार्या एका दैनिकाची नोटीस असलेली बनावट प्रत छापल्याप्रकरणी आमदार गोरे, पत्नी सौ. गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम, महंमद खान या सहा जणांवर येथील पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता.
संस्थेचे आजीव सभासद व खजिनदार आप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी आमदार गोरे यांनी अर्ज केला होता.
(सोमवारी ता. २३) येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश आर. व्ही. हुद्दार यांच्या समोर युक्तीवाद झाला. त्यानंतर आज न्यायाधिश श्री. हुद्दार यांनी आमदार गोरे, सौ. गोरे, शैलजा साळुंखे या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केले.
आमदार गोरे यांच्यावतीने ॲड. एस.एन. सानप, ॲड. ए. एस. खोत, ॲड. बी. एल. हांगे यांनी काम पाहिले.












