IPS तेगबीरसिंह संधु यांचा सिंहगड परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांना दणका;

PS तेगबीरसिंह संधु यांचा सिंहगड परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांना दणका

किरकटवाडी: प्रशिक्षणार्थी आयपीएस तेगबीरसिंह संधु यांनी हवेली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगार आणि अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. एकाच वेळी सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक व डोणजे गावच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांवर छापा टाकत संधु यांच्या पथकाने देशी-विदेशी मद्द्यासह गावठी दारू व गुटख्याचा साठा जप्त केला आहे. संधु यांनी हवेली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगार व अवैध धंदे यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते.त्यानुसार प्रत्येक गावातील गोपीनाय माहिती काढण्यासाठी त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून छापे टाकण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे कारवाई करताना आयपीएस तेगबीरसिंह संधु हे स्वतः त्या पथकाचे नेतृत्व करत आहेत. गोऱ्हे बुद्रुक व डोणजे येथील कारवाईत सुमारे 30 लिटर गावठी दारू, विदेशी मद्द्याच्या 229 बाटल्या, देशी मद्द्याच्या 28 बाटल्या व गुटखा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस तेगबीरसिंह संधु, पोलीस हवालदार रामदास बाबर, पोलीस नाईक किरण कुसाळकर, पोलीस कॉन्स्टेबल मकसूद सय्यद व इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.साहेब कुणाचंच ऐकत नाहीत!पकडलेला माल सोडण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी अवैध धंदेवाल्यांचे आपल्या ‘ओळखीच्या’ पोलीसांमार्फत प्रयत्न सुरू होते मात्र त्यांना संबंधितांकडून ‘साहेब खुप कडक आहेत, ते कुणाचंच ऐकत नाहीत’ हे एकच उत्तर ऐकायला मिळत होते. त्यामुळे आयपीएस तेगबीरसिंग संधु यांच्या धडक कारवाईचा अवैध व्यावसायिकांनी मोठा धसका घेतला आहे.तक्रार आल्यास सोडणार नाहीबेकायदेशीर कृत्यात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास किंवा तक्रार आल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे व त्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे संधु यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here