मुलीचे मैत्रीपूर्ण वागणे म्हणजे शरीरसंबंधासाठी संमती नव्हे; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुलगी अथवा महिला मैत्रीपूर्ण वागली म्हणजे तिने शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती दिली आहे, असा होत नाही, अशी टिप्पणी करत मुंबई उच्च न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नुकताच फेटाळून लावला.
विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुलगी अथवा महिला मैत्रीपूर्ण वागली म्हणजे तिने शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती दिली आहे, असा होत नाही, अशी टिप्पणी करत मुंबई उच्च न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नुकताच फेटाळून लावला.लग्नाचे प्रलोभन दाखवत सक्ती करून बलात्कार केला आणि त्यानंतर गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्याचे वचनही पाळले नाही, असा आरोप करत एका महिलेने मुंबईतील आशीष चकोर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याने अटकेच्या भीतीने त्याने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.तक्रारदार महिलेने संमतीने शरीरसंबंध ठेवले, असा दावा करत चकोरने अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली. मात्र, न्या. भारती डांगरे यांनी दोन्ही बाजू तपासल्यानंतर चकोरची विनंती फेटाळून लावली.
‘केवळ मैत्रीपूर्ण वागल्याने शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती असल्याचे गृहीत धरले जाऊ शकत नाही.
त्यामुळे आरोपीने शरीरसंबंधाला संमती देण्यासाठी सक्ती केली का, याचीही अधिक चौकशी पोलिसांकडून होणे आवश्यक आहे’, असे न्यायमूर्ती आपल्या आदेशात म्हणाले.