पालकांनी जबरदस्तीने बालविवाह लावून दिला, रुपाली चाकणकरांनी केली मुलीची सुटका

पालकांनी जबरदस्तीने बालविवाह लावून दिला, रुपाली चाकणकरांनी केली मुलीची सुटका

खेड शिवापूर येथील एका सतरा वर्षीय मुलीचा तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने बालविवाह लावून दिला. सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या प्रचंड दबावामुळे या मुलीला घराबाहेर पडणे देखील अशक्य झाले होते. परंतु माहेरी आल्यानंतर युक्ती लढवत ती घराबाहेर पडली व तिने तडक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या घरी जाऊन त्यांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सुनावली. चाकणकर यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

पुणे : खेड शिवापूर येथील एका सतरा वर्षीय मुलीचा तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने बालविवाह लावून दिला. सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या प्रचंड दबावामुळे या मुलीला घराबाहेर पडणे देखील अशक्य झाले होते. परंतु माहेरी आल्यानंतर युक्ती लढवत ती घराबाहेर पडली व तिने तडक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या घरी जाऊन त्यांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सुनावली. चाकणकर यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी देखील याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तात्काळ दखल घेत मुलीच्या माहेरच्या तसेच सासरच्या लोकांवर कारवाई केली व मुलीची रवानगी पुण्याच्या बाल सुधारणा गृहात केली आहे.

आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर शांत न बसता त्यावर आवाज उठवणाऱ्या या मुलीवर सर्व स्तरावर कौतुक होत आहे. बालविवाह हा कायदयाने गुन्हा असून बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ नुसार
-वधूचे वय १८ पूर्ण आणि वराचे वय २१ पूर्ण नसेल, तर अशा विवाहास बालविवाह मानले जाते आणि तो गुन्हा आहे.
-वर व वधू यापैकी कुणीही अल्पवयीन असेल, तर तो बालविवाह असतो.

-प्रत्येक बालविवाह विवाहेच्छू कुटुंबांच्या मर्जीने रद्द करता येतो. तो रद्द करताना जिल्हा न्यायाधीश वधू पक्षाला पोटगीरूपी भरपाई देण्याचा आदेश वर पक्षाला देऊ शकतात. वधूचा दुसरा विवाह होईपर्यंत तिला ही भरपाई घेता येते.

शिक्षा:
१. वर १८ वर्षांहून अधिक वयाचा असेल, तर त्याला दोन वर्षे सक्तमजुरी किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

२. बालविवाह लावणारा, ठरवणारा, पार पाडणारा, सूचना देणारे व्यक्ती, संस्था, कळत-नकळतपणे या विवाहाला मान्यता देणारे, या विवाहास उपस्थित राहणारे अशा कुणालाही दोन वर्षे सक्तमजुरी किंवा एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे बालविवाह रोखण्यासंदर्भात अतिशय सकारात्मक पाऊले उचलत असून समाजातून ही मानसिकता नष्ट व्हावी यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. बालविवाह प्रथा ही महाराष्ट्रातून हद्दपार व्हावी व त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जून महिन्यापासून राज्य महिला आयोगाच्या वतीने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे अशा ठिकाणी विशेष अभियान चालू करण्यात येणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली तसेच महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी जर बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास राज्य महिला आयोगाच्या १५५२०९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चाकणकर यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here