न्यायालयाच्या दणक्याने अखेर गुन्हा दाखल ! ‘त्या’ ठेकेदाराला पोलीस ठोकणार का बेड्या ?
नगर महापालिकेच्या कचरा संकलन घोटाळा.
कोरोनच्या पार्श्वभूमीवर नगर शहर आणि परिसरात लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात १७५ ते २०० टन कचरा संकलित केल्याची बिले सादर करुन पुण्याच्या स्वयंभू या संस्थेच्या ठेकेदारानं नगरकरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या ठेकेदाराच्या दुर्दैवानं नगरसेवक गिरीश जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कोर्टानं संबंधित ठेकेदाराविरुध्द गुन्हा करण्याचे आदेश देण्यात आले.
कोर्टाच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात या ठेकेदाराविरुध्द नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतरच्या पोलीस तपासात या भ्रष्टाचारात आणखी कोण कोण सहभागी आहेत, कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल झाला, यानंतर आता तोफखाना पोलीस या ठेकेदाराला अटक करणार का, याकडे नगरवासियांचं लक्ष लागलंय.
कोरोनाच्या काळात दि. १३ जून २०१९ रोजी नगरच्या महापालिकेनं शहरातला कचरा उचलण्यासाठीच्या कामाचा ठेका पुण्याच्या स्वयंभू या ठेकेदार संस्थेला दिला होता. या ठेकेदारानं लाॅकडाऊनमुळे शहरात कर्फ्यूसदृश्य वातावरण असताना २०० टन कचरा संकलित केल्याचा दावा केलाय.
या कामाचं कोट्यवधी रुपयांचं बील या ठेकेदारानं महापालिका प्रशासनाला सादर केलं. परंतू त्याचवेळी शिवसेनेचे जागरुक नगरसेवक गिरीश जाधव यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नगरसेवक जाधव यांनी महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली. परंतू मनपा प्रशासनानं नेहमीप्रमाणं डोळेझाक केली.
नगरसेवक जाधव यांनी यासंदर्भात प्रसिध्द विधिज्ञ अॅड. अभिजित पुप्पाल यांच्यामार्फत याचिका दाखल केली. प्रधान न्यायाधिश सुधाकर येरलागड्डा यांनी जाधव यांच्या याचिकेनुसार संबंधित ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
तत्कालिन अधिकार्यांच्या सहभागाविषयी संदिग्धता?
नगर महापालिकेचे तत्कालिन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या आदेशानुसार या ठेकेदाराला कचरा संकलन करण्याचा ठेका देण्यात आला होता. विशेष म्हणजे कोरोना कालावधीमध्ये नगर शहरात सगळीकडे सामसूम होती. मग एवढा दोनशे टन कचरा कुठून आला, हा मोठा संशोधनाचा विषय झालाय. एवढा मोठा घोटाळा करणारा आणि नगरवासियांच्या डोळ्यात धूळफेक करणार्या या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं पाप त्यावेळच्या अधिकार्यांनी केलंय. त्यामुळे या कचरा संकलन घोटाळ्यात तत्कालिन पोलीस अधिकार्यांचा सहभाग आहे, याविषयी सध्या तरी संदिग्धता आहे.