३ लाख १५ हजार रुपये चोरणारा भामटा काही तासांत जेरबंद! नगर एलसीबीची दमदार कामगिरी

३ लाख १५ हजार रुपये चोरणारा भामटा काही तासांत जेरबंद! नगर एलसीबीची दमदार कामगिरी!नगर शहरातल्या तारकपूर परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयाबाहेरुन मोपेडच्या डिक्कीत ठेवलेली ३ लाख१५ हजार रुपयांची बॅग मोपेडसह चोरणारा भामटा अवघ्या काही तासांत जेरबंद करण्यात आला.

नगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक कटके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही दमदार कारवाई केलीय.

रमेश रामु कोळी (वय ३२, रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश हल्ली रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) असे पकडण्यात आलेल्या भामट्याचं नाव आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोउनि सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, पोकॉ जालिंदर माने, योगेश सातपुते व चालक पोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दि. २९ एप्रिल २०२२ रोजी सागर पवार यांनी नगरच्या लालटाकी येथील बँकेतून ३ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम काढून मित्र सुनिल कांडेकर यांच्या शस्रक्रियेसाठी मोपेच्या (क्र. एमएच१६ सीएम ३३४३) डिक्कीमध्ये ठेवली होती.

ही मोपेडगाडी तारकपूर येथील एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये पवार हे रुग्णाला भेटायला गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्याने मोपेडच्या डिक्कीचे लॉक तोडून रोख रक्कम आणि मोपेड चोरुन नेली.

याप्रकरणी सागर अनिल पवार ( रा. नेप्ती, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४२ / २०२२ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटीलयांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटकेयांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले.

आदेशान्वये पोनि कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक करुन तपासाबाबत सूचना दिल्या. विशेष पथकाने नेवासा परिसरात आरोपीची माहिती आणि शोध घेत असतांना संशयित दोनजण दुचाकीसह नेवासा रोडने औरंगाबादकडे पळून जात आहे, अशी माहिती मिळाली.

पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ औरंगाबाद रोडने जाऊन संशयितांचा पाठलाग सुरु केला. पाठलाग सुरु असतांना पथकातील पोलीस अधिकारी यांनी मिळालेली माहिती सपोनि माने, बिडकीन पोलीस ठाणे आणि पोसई प्रदीप ठुबे, पोना खंदारे, पोना मेटे, पोना वाल्मिक निकम (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, औरंगाबाद ग्रामीण) यांना कळवून संशयितास ताब्यात घेणेबाबत मदत घेऊन चितेगांव टोलनाका येथे नाकाबंदी लावली.

थोड्याच वेळात नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहिती प्रमाणे दोन संशयीत दुचाकीवर येताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा करताच ते औरंगाबादच्या दिशेने पळून जाऊ लागले. दुचाकीवरील संशयितांना पथकाने आडवले.

त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेला पळून गेला आणि दुचाकीस्वार हा दुचाकी आणि बॅगसह शिताफीने ताब्यात घेतला.ताब्यात घेतलेल्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रमेश रामु कोळी ( वय ३२, रा. विजयवाडा रेल्वे स्टेशन जवळ, आंध्र प्रदेश हल्ली रा. हिनानगर, चिकलठाणा, जि बुलढाणा) असे असल्याचे सांगितले.

तसेच त्याचेकडे पळून गेलेल्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे नाव अशोक राम गाजवार, (रा. विजयवाडा रेल्वे स्टेशन जवळ, आंध्र प्रदेश हल्ली रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) (फरार) असे सांगितले.आरोपी रमेश कोळी यांचे जवळ मिळून आलेल्या बॅगेची पंचासमक्ष झडती घेतली असता बँगेमध्ये रोख ३ लाख १५ हजार रुपये रोख रक्कम, ७० हजार रुपये किंमतीची युनिकॉन दुचाकी आणि एच हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. रक्कमेबाबत विचारपूस करता त्याने रक्कम दि. २९ एप्रिल २०२२ रोजी नगर शहरातून चोरी केल्याचे सांगितले. या चोरीच्या घटनेबाबत नगर जिल्ह्यातल्या गुन्हे अभिलेख पडताळणी करता दि. २९ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर शहरात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील कारवाई तोफखाना पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here