पुण्यात कपडे विक्रेत्याची पावणेतीन लाखांना फसवणूक; नवीन कपड्यांऐवजी पाठवल्या चिंध्या:

पुण्यात कपडे विक्रेत्याची पावणेतीन लाखांना फसवणूक; नवीन कपड्यांऐवजी पाठवल्या चिंध्या

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकपडे खरेदीसाठी घाऊक व्यापाऱ्याला पावणेतीन लाख रुपयांची रक्कम अदा केल्यानंतर, रविवार पेठेतील एका कपडे विक्रेत्याला कपड्यांऐवजी गोणीतून कपड्याच्या चिंध्या मिळाल्याने या विक्रेत्याची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत रविवार पेठेतील कपडे विक्रेते आयाज नजीर मोमीन (वय ३६, रा. रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अंजनी टेक्सटाईल्सचे मालक हितेश कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोमीन यांचा रविवार पेठेतील कापडगंज परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी कपड्यांचे घाऊक व्यापारी हितेश कुमार याच्याकडे कपडे खरेदीसाठी दोन लाख ७८ हजार रुपये दिले होते. मात्र कुमारने त्यांना गोणीतून कपडे पाठविले असल्याचे मोमीन यांनी सांगितले.मोमीन यांच्या दुकानात नवीन कपड्यांच्या गोणी वाहतूकदाराने दिल्या. गोणी दिल्यानंतर वाहतूकदार तेथून गेला. मोमीन यांनी गोणी उघडून पाहिल्या. त्या वेळी पाच गोणींमध्ये नवीन कपड्यांऐवजी कापडाच्या चिंध्या असल्याचे निदर्शनास आले. यानंतर मोमीन यांनी या संबंधी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मोकाशी तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here