जि. प.तील अभियंता हर्षद महादेव काकडे यास विनयभंग व धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील अभियंता हर्षद महादेव काकडे याला विनयभंग व धमकावल्याबद्दल 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी सुनावली आहे.काकडे हे सध्या पाथर्डी पंचायत समितीत कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये 2010 मध्ये काकडे हे कनिष्ठ अभियंता म्हणून होते. त्यांच्याविरुद्ध अहमदनगर येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल होता. या खटल्यातील वादीच्या महिला वकिल या न्यायालयात दि.10 जून 2010 रोजी जात होत्या. या महिला वकिलास अभियंता हर्षद काकडे यांनी धमकावून त्यांचा विनयभंग केला होता. या महिला वकिलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून काकडे याच्याविरुद्ध विनयभंग, धमकाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काकडे यांनी ही संबंधित महिला वकिलाविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी विनयभंग व धमकावल्याच्या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ॲट्रॉसिटी कायद्यातून संबंधित महिला वकिलाची निर्दोष मुक्‍तता करण्यात आली आहे. विनयभंगाच्या खटल्यात सरकारतर्फे 7 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडापैकी पाच हजार रुपये फिर्यादीला देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ॲड. केदार केसकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here