नगर : किरकाेळ कारणाहून राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर रायफलीतून गाेळ्या झाडून स्वतःवरही गाेळ्या झाडून घेतल्या. शहीद कमांडाे बंडू बन्सी नवथर (रा. पिंपरी शहाली, ता. नेवासे) आणि हल्ला करणारा जवान श्रीकांत बेरड (रा. दरेवाडी, ता. नगर) अशी मृत्यू झालेल्या दाेघांची नावे आहेत.
गडचिराेली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मरपल्ली पाेलिस ठाण्यात एक जूनला सायंकाळी ही घटना घडली. मयत झालेले दाेन्ही जवान अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या घटनेची चर्चा होत आहे. याशिवाय हल्ला करणारा जवान अहमदनगर शहरातील एका महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे.
याबाबत माहिती अशी, अहेरी तालुक्यातील मरपल्ली पाेलिस ठाण्यात पुणे येथील राज्य राखीव दलाचे जवान बंदाेबस्ताला हाेते. त्यावेळी जवान श्रीकांत बेरड याने त्याच्याकडील रायफलमधून कमांडाे बंडू नवथर यांच्यावर गाेळीबार केला. या हल्ल्यात कमांडाे नवथर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जवान बेरड याने स्वतःवरही गाेळ्या झाडून घेतल्या. यात त्याचाही मृत्यू झाला. बेरड याने हा गाेळीबार काेणत्या कारणातून केला, याचा उलगडा हाेऊ शकलेला नाही.
दरम्यान, शहीद कमांडाे बंडू नवथर यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी पिंपरी शहाली (ता. नेवासे) येथे आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. राज्य राखीव दलाच्या जवानांनी त्यांना हवेत गाेळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. कमांडाे नवथर यांच्या अशा मृत्यूमुळे शाेक व्यक्त केला जात आहे. राज्य राखीव दलात झालेल्या या घटनेत दाेघेही अहमदनगर जिल्ह्यातील असल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमागे किरकाेळ कारण असल्याचे सांगितले जात आहे. अधिक तपास उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर करत आहेत.











