- मुंबईः येत्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून, अनेकांनी आतापासून लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी केलीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गणेशोत्सव मंडळ चार फुटांची मूर्ती आणणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिका आणि गणेश मंडळे यांच्यात एक बैठक झालीय. या बैठकीत सर्व मंडळे चार फुटांची मूर्ती आणणार असल्याचं ठरवण्यात आलंय.
- विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही
- मोठ्या मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जनस्थळी (चौपट्यावर) विसर्जन करता येणार आहे. तसेच ठराविक कार्यकर्त्यांसह हे विसर्जन करता येणार असून, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, असंही बैठकीत ठरलंय. कोरोनाच्या संकटापायी यंदासुद्धा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना असल्याने नियमांचं पालन करावं लागणार आहे. चौपट्यांवर मोठ्या मंडळांना गणपती विसर्जन करता येणार आहे. यावेळी फक्त 10 कार्यकर्ते असतील, कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असंही नियमावलीत स्पष्ट करण्यात आलंय.
- गतवर्षीची नियमावली कायम ठेवण्यात येणार
- आगामी गणेशोत्सवसाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संपन्न झालीय. यात गतवर्षीची नियमावली कायम ठेवण्यात येणार आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय पोलिसांसोबत चर्चा करून वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे.
- अशी असणार नियमावली?
- सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट राहणार
- घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी
- गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांना घ्यावी लागणार
- 84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाणांची निर्मिती
- विसर्जन ठिकाणी महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल
- त्यानंतर महापालिका गणेश विसर्जन करणार आहे
- सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी 10 कार्यकर्त्यांना परवानगी
- लहान मुले आणि ज्येष्ठांनी विसर्जनच्या ठिकाणी जाऊ नये
- ऑनलाईन दर्शनाची सोय करावी
- नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी
- शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
- सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
- आरती, भजन, कीर्तन यादरम्यान होणारी गर्दी टाळावी.
- नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
- गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी




