‘टाटा’ने जिंकली नवीन ‘संसद’ बांधण्याची निविदा!
नवी दिल्ली : नवीन संसदेच्या इमारतीचे निर्माण कार्य करण्याचे सौभाग्य देशातील प्रसिद्ध आणि आपल्या विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या टाटा ग्रुपला मिळणार आहे. टाटा प्रोजेक्टने नवीन संसदेच्या बांधकामाचे कंत्राट ८६१.९० कोटी रुपयाला मिळवले आहे. त्यांनी या बोलीत लार्सन अँड टर्बो कंपनीला मागे टाकले. लार्सन अँड टर्बोने ८६५ कोटींची बोली लावली होती.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज ( दि. १६ ) नव्या संसद भवनाच्या बांधकाम कंत्राटाच्या बोलीसंदर्भातील माहिती खुली केली. हा प्रकल्प एका वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. सरकारी संस्थेने या प्रकल्पाची अंदाजे किंमत ९४० कोटी इतकी वर्तवली होती. संसदेची ही नवी इमारत त्रिकोणी आकाराची असणार आहे.
सध्याच्या संसदेची इमारत ब्रिटीश काळात बांधण्यात आली होती. ती वर्तुळाकार आकाराची आहे. नवीन इमारत बांधून झाली की ही जुनी संसदेची इमारत दुरुस्त करुन वेगळ्या उद्येशासाठी वापरण्यात येणार असल्याते अधिकाऱ्यांनी सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने नवे संसद भवन बांधण्याची का गरज आहे असे विचारल्यावर सध्याची इमारत जुनाट दिसत अल्याचे कारण दिले होते.
याचबरोबर जर लोकसभा मतदार संघांची पुर्नबांधनी करण्यात आली तर लोकसभेतील प्रतिनिधींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या संसद भवनात अतिरिक्त सदस्यांना बसण्याची जागा नाही. असे उत्तर विरोधकांच्या प्रश्नावर सरकारने दिले होते.