Amravati | स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

595
  • अडचणींवर खंबीरपणे मात करत विकासाचा प्रवाह गतिमान
  • – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
  • कोरोना महासंकट व विविध अडचणींवर खंबीरपणे मात करत विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. समाजातील वंचित, गरीब, महिला, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, कष्टकरी अशा विविध घटकांसह सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाचा हा प्रवाह एकजुटीने पुढे नेऊया. भारत देश व महाराष्ट्र अधिक सशक्त, बलशाली व विकसित करण्याचा निर्धार या स्वातंत्र्य दिनानिमित्त करुया, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
  • भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी यावेळी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना शुभेच्छा देत संबोधित केले.
  • मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, एसआरपीएफ समादेशक हर्ष पोदार, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, अजय लहाने, विजय भाकरे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, विजय जाधव, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जाधव, पालकमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद कापडे, रवी महाले, अरविंद माळवे, अमोल साबळे आदी उपस्थित होते.
  • पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्वातंत्र्य म्हणजे केवळ मुक्ती नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती, हक्क व जबाबदारी या जाणिवांचा संगम आहे. स्वातंत्र्य व लोकशाहीच्या याच मूल्यांशी जोपासना करत समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचे ध्येय बाळगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी शासनाची वाटचाल होत आहे. गत दीड वर्षापासून आपण सर्व कितीतरी पातळ्यांवर कोरोना संकटाशी लढत आहोत. या काळात जीवाची जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावणा-या सर्वांप्रती पालकमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
  • संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठीही शासन- प्रशासन सुसज्ज असून, समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला महाविकास आघाडी शासनाने गती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाकाळात निर्माण करण्यात आलेल्या विविध रुग्णालये, लॅब, ऑक्सिजन प्लान्ट, लसीकरण, सर्वेक्षण मोहिम आदींबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.
  • ई- पीक पाहणी व इतर निर्णय
  • ई पीक पाहणी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. महसूल व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने ई पीक पाहणी प्रकल्प आजपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देताना पालकमंत्री म्हणाल्या की, ई- पीक पाहणीमुळे या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल. नुकसान झाल्यास भरपाई तत्काळ मिळेल व पिकांची नेमकी आकडेवारी मिळून कृषी नियोजन अधिक अचूक होणार आहे.
  • जगाचा पोशिंदा मानल्या जाणा-या शेतकरी बांधवांसाठी शासन अनेक योजना राबवत आहे. अतिवृष्टीसारखी संकटे उद्भवली असताना अमरावती जिल्ह्यात पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात आली. आपद्ग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी उणे प्राधिकारात रक्कम काढण्याचे अधिकार प्रशासनाला दिले. खरीप हंगाम कर्ज वाटपासाठी 1 हजार 201.11 कोटी तर रब्बी हंगामासाठी 648.89 कोटी कर्ज वाटापाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे 90 हजार शेतकऱ्यांना साडे आठशे कोटी रुपयांहून अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण 70 टक्क्याहून अधिक आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 15 हजार 338 शेतकऱ्यांना 830.53 कोटींचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी ते थेट ग्राहक योजना, कृषी संजीवनी सप्ताह, बांधावर खतपुरवठा, पोकरा योजना, कृषी सिंचन, एक जिल्हा एक उत्पादन याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.
  • त्या पुढे म्हणाल्या की, औद्योगिक धोरण व ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत उद्योगवाढीसाठी प्रयत्न होत आहेत. औद्योगिक समूह विकास योजनेत अमरावतीत सोलर चरखा क्लस्टर, परतवाडा येथे टिकवुड फर्निचर क्लस्टर, अंजनगाव सुर्जी येथे गारमेंट क्लस्टर, अचलपूरला मिल्क प्रोडक्ट क्लस्टर व धारणीत मेळघाट मिल्क प्रोसेसिंग क्लस्टर निर्माण करण्यात आले आहेत. अमरावती येथे अगरबत्ती क्लस्टरही सुरू होत आहे. नांदगावपेठ येथे अतिरिक्त अमरावती एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यात आले असून, 13 नामांकित वस्त्रोद्योग कंपन्यांनी गुंतवणूक सुरू केली आहे. एकूण 1 हजार 596 कोटींची गुंतवणूक व 4 हजार 644 रोजगार अपेक्षित आहे. इंडो काऊंट इंडस्ट्रीजसह आणखी उद्योग लवकरच सुरू होणार असून, त्यातून एकूण अडीच हजार कोटींची गुंतवणूक व तीन हजारांवर व्यक्तींना रोजगार निर्माण होणार आहे.
  • त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामविकास विभागाने गतीने कामे करून 200 दिवसांचे महाआवास अभियान यशस्वीरित्या पूर्ण केले. अमरावती जिल्ह्यात महाआवास अभियानाच्या माध्यमातून 5 हजार 79 लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच राज्य पुरस्कृत योजनेत 20 हजार 27 लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करण्यात आली. तसेच अभियान काळात अमरावती जिल्ह्यात 8 हजार 500 घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. सामाजिक न्याय विभागातर्फे विविध वंचित घटकातील सुमारे 63 हजार विद्यार्थ्यांना 2020-21 या वर्षात शिष्यवृत्ती व शिक्षण फीचा लाभ देण्यात आला आहे. रमाई घरकुल योजनेत 46 हजार 828 घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून 30 हजार 366 घरे पूर्ण झाली आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजनेत 1 हजार 53 एकर जमीन 303 लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आली आहे.
  • मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे व बालमृत्यू रोखण्यासाठी पोषण आहार योजना, गरोदर, स्तनदा मातांना चौरस आहार, बालकांना न्यूट्रिशियस फूड, बालकांची नियमित तपासणी व उपचार आदी विविध प्रयत्न वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या समन्वयातून होत आहेत. कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाणही घटले. गेल्या तीन वर्षांत सातत्याने घट होत आहे. 2019-20 मध्ये बालमृत्यूदर 5.94 वरून 2021-22 मध्ये 3.62 इतका झाला आहे. उपजत मृत्यूदरही कमी झाला असून, 2019 मध्ये 3.65 वरून 2021 मध्ये 1.03 पर्यंत घटला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here