पोलीस विभागाने दबावतंत्र न वापरता सहकार्य करावे, पोलीस बांधव सुध्दा खेळाडू व क्रीडाप्रेमीच
औरंगाबाद : औरंगाबाद येथे प्रस्तावित व जागा निश्चित झालेली आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाविकास आघाडी सरकारने राजकीय हेतुपोटी दबावाखाली पुणे येथे हलवून मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय केल्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाच्या शासकीय कार्यक्रमानंतर सर्वसामान्य जनता व एमआयएम पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करुन काले झेंडे दाखविण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवुन पालकमंत्र्यांना क्रीडा विद्यापीठ का हलविण्यात आले याचा जाब विचारण्यात येणार असुन पोलीस विभागाने दबावतंत्र न वापरता आंदोलनास सहकार्य करावे कारण की पोलीस विभागात बहुतेक जण खेळाडू असुन त्यांच्याहुन जास्त क्रीडाप्रेमी कोणत्याच विभागात नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
क्रीडा विद्यापीठ सुरु झाले असते तर मराठवाड्यातील गुणवंत खेळाडूंना याचा भरपुर फायदा नक्कीच मिळाला असता, कोणाच्या दादागीरी वरुन क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेतुन पळविण्यात आले याचा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी व त्यांच्याशी संबंधित नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला उत्तर देणे गरजेचे असुन नसता जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, मराठवाड्याशी संबंधित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी धार्मिक भावनांशी खेळून जातीपातीचे राजकारण करणे बंद करुन क्रीडा विद्यापीठ परत औरंगाबादला खेचून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले.
क्रीडा विद्यापीठ हे मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टिने व गुणवंत खेळाडूंच्या भविष्याकरिता अत्यंत महत्वाचे असुन एका राज्यात फक्त एकच क्रीडा विद्यापीठाची परवानगी असल्याने आता भविष्यात कधीही दुसरे क्रीडा विद्यापीठ मिळणार नसल्याने राजकीय मतभेद बाजुला ठेवुन मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व त्यांच्या कार्यकत्र्यांनी खेळाडूंच्या भविष्यासाठी एकत्रीत येवुन मराठवाड्याचा विकासाकरिता लढावे असे हि खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने व गुणवंत खेळाडूसाठी क्रीडा विद्यापीठ जिव्हाळ्याचा विषय बनला असून आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे पळविल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी आता आक्रमकतेची भुमिका घेतली असुन लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखविण्यासाठी सर्वसामान्य जनता, क्रीडा क्षेत्राशी निगडीत प्रतिष्ठित व्यक्ती, नामांकित शाळा, महाविद्यालय व संस्था तसेच मराठवाड्यातील गुणवंत खेळाडूनी सहभागी होण्याचे आवाहन केले.