शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण जिल्ह्याची वाटचाल ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे – ना.बच्चू कडू

519

अकोला,दि.14(जिमाका)- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची पूर्तता करतांना आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची खूप धावपळ झाली. कोविड उपचारात ऑक्सिजनची पूर्तता अबाधित रहावी.यासाठी नियोजन करुन ऑक्सिजन निर्मिती स्थानिक पातळीवर करुन व त्याची उपलब्धता सज्ज ठेवून आता जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वंयपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले. आज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण ना. कडू यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधान परिषद सदस्य आमदार ॲड. किरण सरनाईक, शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. अपूर्वा पावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्यामकुमार सिरसाम, डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. कडू म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस रुग्णांची सेवा करुन कोरोना मुक्त करण्यास शर्तीचे प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याबाबत ना. कडू यांनी कौतूक केले. सद्यास्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता गाफिल न राहता पूर्ण क्षमतेने तयार रहा. ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वंयपुर्ण होत आहे. तसेच आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत ना. कडू यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here