पैठणच्या औद्यागिक विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात – उद्योगमंत्री सुभाष देसाई

761

औरंगाबाद, दि. 14 (जिमाका) : ग्रामीण भागातील उद्योग वाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहन व सुविधा देणे आवश्यक आहे. पैठण औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना वीज, पाणी, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रशासनाने तत्परतेने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पैठण येथील औद्योगिक विकासाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता श्रीहरी दराडे, प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी, कार्यकारी अभियंता श्री. गिरी, तसेच पैठण उद्योजक संघटनेचे अध्यक्ष लोंढा यांच्यासह विविध उद्योजक या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी बैठकीत पैठण औद्योगिक विकासासंदर्भात पुरवण्यात आलेल्या सोईसुविधा, नवीन उद्योजकांना उपलब्ध करुन देण्यात येणारा भूखंड, कृषी आधारित उद्योगांना जागा, बांधकाम परवाना, पाण्याच्या दरात कपात, रस्ते सुविधा, औद्योगिक वसाहतीत वृक्ष लागवड, निवासी भूखंड, वीज वितरणाच्या अडचणी याबाबत उद्योजक संघटनेच्या विविध अडचणी, उपाययोजनाबाबत चर्चा केली. तसेच याबाबत उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी श्री. देसाई यांनी दिल्या.
कर सवलत, CSR अतंर्गत कोणकोणते उपक्रम उद्योजक आणि शासन यांच्या समन्वयाने राबवू शकतो याबबात चर्चा करुन स्थानिक तरुणांना उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘महाजॉब्स’ या उद्योग विभागाच्या वेबपोर्टलच्या माध्यमातून नोंदणी व कौशल्य आधारित रोजगार पूरवण्यासाठी उद्योग विभाग काम करीत आहे. ग्रामीण तसेच शहरी दोन्ही भागातील उद्योजकांनी नोकर भरती किंवा मनुष्यबळ घेण्यासाठी महाजॉब्सच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here