खुमासदार ‘जाने भी दो यारो” ला ३८ वर्षे

486

विनोदाचे अनेक प्रकार आहेत. त्यात एक आहे, विडंबनात्मक! असे काही चित्रपट काळाच्या जणू पुढचे असतात. त्यांना कितीही वर्षे झाली, काळ पुढे सरकला तरी ते चित्रपट पुन्हा पुन्हा तितकाच आनंद देतात. कुंदन शहा दिग्दर्शित 'जाने भी दो यारो ' ( रिलीज १२ ऑगस्ट १९८३) हा अगदी तस्साच आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी ३८ वर्षे पूर्ण झाली. चाकोरीबाहेरचे काही पाहू इच्छणारे रसिकांना हा चित्रपट खूप आवडला. खरं तर ह्या सिनेमातले अनेक संदर्भ बदलले, सिनेमात दाखवलेली मुंबई तर आरपार बदलली. तरीही ह्या सिनेमाची मुलतत्वे बदलली नाहीत, ढाँचा बदलला नाही; किंबहुना काळाच्या ओघात अजूनच पक्का झाला. त्यामुळे इतकी वर्षे होऊनही कुठेही तो कालबाह्य वाटत नाही. आणि तेच तर महत्वाचे आहे, आणि म्हणूनच हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला जातो. या चित्रपटाचे  वैशिष्ट्य म्हणजे इथे रूढार्थाने कोणीच हिरो हिराॅइन्स नाहीत. आहेत ते विनोद चोप्रा (नसिरभाई) आणि सुधीर मिश्रा (रवि वासवानी) नावाचे दोन भोळसट मित्र. बाकी सगळेजण ग्रे किंवा ब्लॅक शेडस् मध्येच आहेत. अगदी शोभा सेन (भक्ती बर्वे) ही काही काळ ध्येयवादी वाटणारी पत्रकारही नंतर आपला असली चेहरा दाखवते. हा पंच छान जमलाय. या चित्रपटात गाणी नाहीत, आहे फक्त ब्लॅक ह्युमर. अनेक अतर्क्य घटना इतक्या वेगाने घडतात, की आपल्याला विचार करायलाही उसंत मिळत नाही. विशेषतः कमिशनर डिमेलो (सतीश शहा) दोन्ही बिल्डर्स (पंकज कपूर आणि ओम पुरी) बरोबर डबल गेम करतो, नंतर त्याचा खून होतो; तिथून या सिनेमात नाट्यपूर्ण रंगत येत जाते. 

क्लायमॅक्सला हे सगळे ‘कलाकार’ महाभारत वरील एका पौराणिक नाटकात घुसतात आणि पूर्ण बट्ट्याबोळ कसा करतात, ते पडद्यावर पाहण्यातच खरी मजा आहे.
पण हा चित्रपट खरा दणका देतो तो शेवटी. पोलिस आल्यावर विनोद आणि सुधीर सगळं खरं सांगतात. तिकडे बाकी सगळे व्यवस्थित ‘तोडपाणी’ करतात; हे आजच्या काळाला अत्यंत साजेसं आहे. त्याही पुढे जाऊन विनोद आणि सुधीरच तुरूंगात जातात, आणि पार्श्वभूमीवर “हम होंगे कामयाब” हे गाणं वाजत राहातं, तेंव्हा प्रेक्षक आश्चर्यचकित होतो आणि त्या तेथेच सिनेमा संपतो. प्रेक्षक चक्रावून जातो, असं व्हायला नको होतं असं त्याला वाटतं. पण भानावर आल्यावर कळतं, की हेच वास्तव आहे. आजूबाजूला हेच तर चालू आहे. आणि त्याच क्षणी हा सिनेमा खूप उंचावर जातो. या चित्रपटाचा हा हायपाॅईंट ठरला. नसिरुद्दीन शहा, रवि वासवानी, भक्ती बर्वे, पंकज कपूर, ओम पुरी, सतीश शहा, नीना गुप्ता….सर्वच कसलेले कलाकार. सर्वांचेच अभिनय उत्तम. सिनेमात जागोजागी विनोदी प्रसंग पेरल्याने तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. संवाद चुरचुरीत आहेत. आणि या खेळकर, खोडकर, मजेशीर चित्रपटाचा अनुभव रंजक ठरतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here