राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

982

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः अनुदानासाठी
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

    अकोला,दि.६ (जिमाका)-  सन २०२१-२२ अंतर्गत  रब्बी हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य, गळीतधान्य, नगदी पिके कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य या पिकांचे अनुदानीत दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करुन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.

राज्यात सन २०१४-१५ च्या मागदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. तसेच सन २०१८-१९ पासून अभियानात पौष्टिक तृणधान्य व गळीत धान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानासाठी केंद्र व राज्याचे प्रमाण ६० व ४० टक्के आहे.

योजनेचा उद्देश – क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविणे, शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावणे, अपारंपारीक भातपड क्षेत्रावर कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या क्षेत्र वृद्धी व उत्पादकतेत वाढ करणे.

अभियानात राबविण्यात येणाऱ्या बाबी – पीक प्रात्यक्षिके, पीक पद्धतीवर आधारीत प्रात्यक्षिक, मुलभूत बियाणे खरेदी, प्रमाणित बियाणे वितरण व बियाणे उत्पादनास अर्थसहाय्य, एकात्मिक किड व अन्नद्रव्ये व्यवस्थापन, सुधारित कृषि औजारे व सिंचन साधन, पीक पद्धतीवर आधारीत प्रशिक्षण, वैशिष्टपूर्ण बाबी शेतकऱ्याच्या शेतमालाचे मुल्यवर्धनासाठी मिनी दाल मिली (शेतकरी गटासाठी), बीज प्रक्रिया संच(एपीओसाठी) तेलघाणी इत्यादी घटकांची स्थानिक पुढाकाराच्या बाबींतर्गत अंमलबजावणी केली जाईल.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य, गळीतधान्य, नगदी पिके सन २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य या पिकांचे अनुदानीत दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करुन अर्ज करावेत. महाडीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांमधून मंजूर कार्यक्रमाच्या मर्यादेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. राष्‍ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची माहिती कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in वेबसाईट उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. कांताप्पा खोत केले आहे.
०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here