एरंडा येथील शेतकरी गटाच्या ‘फार्मलॅब्ज’ला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांची भेट
• टोकन पद्धतीने सोयाबीन लागवडीची घेतली माहिती
वाशिम, दि. ०६ (जिमाका) : मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील जय किसान शेतकरी गटाच्या ‘फार्मलॅब्ज’ या प्रयोगशाळेला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ६ ऑगस्ट रोजी भेट दिली. या प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीसह शेतकरी गटातील सदस्यांनी टोकन पद्धतीने केलेली सोयाबीन लागवड आणि जैविक खतांच्या सहाय्याने उत्पन्न घेतले जाणाऱ्या डाळिंब बागेची पाहणी केली.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ, जय किसान शेतकरी गटाचे अध्यक्ष दीपक घुगे, राजू सांगळे, योगेश चव्हाण, डॉ. सुभाष सानप, माधवराव सांगळे यांच्यासह शेतकरी गटाचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जय किसान शेतकरी गटाच्या ‘फार्मलॅब्ज’ची पाहणी केली. तसेच या प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीची माहिती गटाचे अध्यक्ष श्री. घुगे यांच्याकडून जाणून घेतली. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून ट्रायकोडर्मा, सिव्हीड एक्स्ट्रॅक्ट, निम ऑईल, करंज ऑईल, गांडूळ खत, बायोस्लरी यासारख्या जैविक खतांची निर्मिती केली जात आहे. सध्या या गटातील १८० शेतकरी या जैविक खतांचा वापर आपल्या शेतामध्ये करीत आहे. या खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत झाली असून निव्वळ उत्पन्नात वाढ झाले. तसेच या खतांमुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सुद्धा मदत होत असल्याचे गटाचे अध्यक्ष श्री. घुगे यांनी सांगितले.
जय किसान शेतकरी गटातील शेतकरी राजू सांगळे यांनी आपल्या शेतामध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या केडीएस ७२६ (फुले संगम) वाणाच्या सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड केली असून या लागवड पद्धतीचीही जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी पाहणी केली. तसेच दीपक घुगे यांनी ९० टक्के जैविक खते व १० टक्के रासायनिक खतांचा वापर करून डाळिंब शेती करीत आहेत. या डाळिंब बागेचीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पाहणी केली.
या गटातील शेतकरी २०१५ पासून प्रत्येक पिकासाठी येणारा खर्च व त्यामधून मिळणारे उत्पन्न याच्या नोंदी ठेवत आहेत. पाणी, खते, बियाण यासह इतर प्रत्येक बाबीवर झालेल्या खर्चाची नोंद यामध्ये समाविष्ट आहे. काही शेतकऱ्यांच्या नोंदवहीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक केले. टोकन पद्धतीने लागवड केलेल्या केडीएस ७२६ (फुले संगम) वाणाच्या सोयाबीन पिकासाठी येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या नोंदी ठेवाव्यात व पुढील हंगामात इतर शेतकऱ्यांना बियाणे म्हणून हे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.






