कोविडमुळे मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनारेशिम संचालनालयाच्या वतीने आर्थिक मदत
नागपूर दि. 27 : रेशीम संचालनालयात कर्तव्यावर असताना कोविडमुळे मृत्यु पावलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. संचालक भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते आज एका छोटेखानी कार्यक्रमात ही मदत कुटुबियांना सुपूर्द करण्यात आली.
कोविड महामारीत असंख्य लोकांना जीव गमवावा लागला. घरचा कमावता जीव गेल्याने कुटुंबांचा आधार गेला आहे. रेशीम संचालनालयात राज्यभर 379 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी कोविडमुळे दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
संचालनालयातील सर्व कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवेदना जपत सहकाऱ्यांसाठी एक लक्ष आठ हजार एवढा निधी संकलीत केला. गुरूनाथ रंभापुरे, लातूर आणि तानाजी शिर्के, कोल्हापूर यांच्या कुटुंबियास ही आर्थिक मदत विभागून देण्यात आली.
या वेळी संचालक श्रीमती भाग्यश्री बाणायत यांनी कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शासकीय मदतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासित केले.
यावेळी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक नागपूर श्री. गोरे, उपसंचालक औरंगाबाद श्री. हाके, सहायक संचालक श्री. ढवळे, व्ही. एम. पौनिकर व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.