वायसीएमच्या डॉक्टर यांचा जीव धोक्यात, रात्रीअपरात्री गाठावी लागतेय पोलीस चौकी
पिंपरी, ता. 15 : जांभे गावातून मध्यरात्री साडेबारा वाजता अत्यवस्थेतील रुग्ण वायसीएम रुग्णालयात घेऊन आले. रुग्णाची ऑक्सीजन लेव्हल 50 होती. पण आयसीयू विभाग आणि वार्डात जागा नाही. बेड उपलब्ध नव्हते. त्यामुळे नाईट ड्युटीवरील डॉक्टरानी रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र रुग्णांच्या नातेवाईकानी अरेरावी करत गोंधळ घातला. संबंधित डॉक्टराला मारून टाकण्याची धमकी दिल्यामुळे त्या डॉक्टरने रात्रीच संत तुकाराम नगरची पोलीस चौकी गाठली. हा प्रकार सोमवारी (ता.14) मध्यरात्री घडला. परिणामी पुन्हा एकदा डॉक्टरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
डॉ. अविनाश सानप व त्यांचे सहकारी नाईट ड्युटी बजावत होते. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सध्या बेड उपलब्ध नाहीत. अशातच सोमवारी जांभेगावातून काहीजण एका रुग्णाला घेऊन आले. त्यांची प्रकृती अत्यंत बिकट होती. वेळेत उपचार मिळण्यासाठी त्या रुग्णाला दुसरीकडे ऍडमिट करण्यास सांगितले. पण नातेवाईक ऐकायला तयार होईना. बरेच समुपदेशन केल्यावर ते तयार झाले. खासगी कधी मिळणार? म्हणून डॉक्टरानीं वायसीएमची ऍम्ब्युलन्स दिली. पण ससूनकडे जाताना रुग्ण वाटेतच दगावला. तेथे “डेड पेशंट” म्हणून नाकारले. नातेवाईकानीं रुग्णवाहिका परत करण्याऐवजी जांभेगावाला निघाले. ऍम्ब्युलन्स ड्रॉयव्हरने डॉक्टरला फोनद्वारे कळवले. तेव्हा त्या डॉक्टरने संत तुकाराम नगर पोलीस चौकीत जाऊन हकीकत सांगितली. पोलिसांनी नातेवाईकांना ऍम्ब्युलन्स परत आणण्यास सांगितले.
डॉ. सानप म्हणाले, “प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे. रात्री अपरात्री सुरक्षितता अधिक वाढवण्याची गरज आहे. कालरात्री पोलिसांमुळे थोडक्यात बचावलो. “