- दि.03.05.2021
- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही रुग्णास
- वैयक्तीकरीत्या इंजेक्शनचा पुरवठा केल्या जात नाही
- -नितीन पाटील
- नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
- वर्धा दि, 3 मे (जिमाका):- कोवीड-19 बाधित रुग्णास आवश्यक रेमडिसीवीर इंजेक्शनच्या पुरवठयाबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांच्या मान्यतेने रुग्णास वैयक्तीकरित्या इंजेक्शनचा पुरवठा केल्या जातो,असा गैरसमज निर्माण झालेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोविड रुग्णालयास फक्त त्यांचे मागणीनुसार वितरकाकडे असलेल्या उपलब्धतेनूसार कोटा मंजूर करण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही रुग्णास वैयक्तीकरीत्या इंजेक्शनचा पुरवठा केल्या जात नाही. काही नागरीकांकडून समाजात गैरसमज पसरविण्यात येत असून नागरीकांना कोणत्याही भूल-थापाना बळी पडू नये, व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.
- कोवीड रुग्णालय रुग्णाच्या नातेवाईकास रेमडेसिवीर इंजेक्शन आणायला सांगतात. रुग्णाचे आप्तमंडळी रुग्णाचा जीव वाचण्याच्या उद्देशाने रेमडिसीवीर इंजेक्शनच्या शोधात जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांच्याकडे इंजेक्शनची मागणी करतात. इंजेक्शनचा पुरवठा न झाल्यास रुग्णाचे नातेवाईक अरेरावीच्या भाषेसोबतच भांडणही करतात.
- जनतेमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
- सार्वजनिक आरोग्य, विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार जिल्ह्यातील वितरकाकडे उपलब्ध साठ्यानुसार कोणत्या वितरकाकडून किती रेमडिसिव्हीर इंजेक्शन कोणत्या कोविड रुग्णालयाला पुरवठा करायचे एवढेच नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केले जाते. प्रत्यक्षात रेमेडिसिव्हीर इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यलयात उपलब्ध नसते किंवा त्याचा साठा सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवलेला नसतो.
- वर्धा जिल्हयातील कोवीड-19 या विषाणूजन्य आजाराने प्रभावित रुग्णांकरीता त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार (गंभीर रुग्ण प्रथम) उतरत्या क्रमाने रेमडिसीवर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार सर्व कोविड रुग्णालयाकडून मागणी व माहिती मागविली जाते. जिल्हा शल्य चिकित्सक,यांचे शिफारसीनुसार उपलब्ध औषधाच्या प्रमाणात संबंधित कोवीड रुग्णालयास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केवळ कोटा मंजूर करण्यात येऊन वितरक निश्चित करुन देण्यात येतो. मंजूर करण्यात आलेला कोटा संबंधित वितरकाकडून प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी ही संबंधित कोविड रुग्णालयाची आहे.
- संबंधित रुग्णालय कोणत्या रुग्णाला इंजेक्शन देणार आहे, त्या रुग्णाच्या नावासाहित मार्कर पेनने वितरकांकडे लिहून दिल्यानंतरच औषध देण्याच्या सुचना निर्गमित केल्या आहेत. शिवाय रुग्णांना औषध वाटप झाल्यानंतर रिकाम्या बाटला जतन करुन ठेवणे व भरारी पथकास उपलब्ध करुन देणे सुद्धा रुग्णालयाना बंधनकारक करण्यात आलेले आहे.
- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही रुग्णास वैयक्तीकरीत्या इंजेक्शनचापुरवठा केल्या जात नाही. काही लोकांनी नागरीकांमध्ये निर्माण केलेल्या गैरसमज पसरविले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरीकांनी अशा कोणत्याही भूल- थापाना बळी पडू नये.
- रुग्णास रेमडिसीवीर इंजेक्शनची आवश्यकता भासल्यास वर्धा जिल्ह्यातील ज्या रुग्णालयात रुग्ण दाखल आहे ते संबंधित कोवीड रुग्णालय त्याबाबतची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास करतील व त्यांच्या मागणीप्रमाणे व उपलब्धतेनूसार त्या रुग्णालयाला ठरवून दिलेले वितरक पूरवठा करतील याची जनतेने नोंद घ्यावी.
- 0000






