लहुजी शक्ती सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुभाष घोरपडे यांचे निधन

764


ऑनलाईन शोकसभा घेऊन श्रध्दांजली
वंचित व दुर्बल घटकांसाठी कार्य करणारा कार्यकर्ता हरपला -विष्णूभाऊ कसबे
अहमदनगर(प्रतिनिधी)- येथील लहुजी शक्ती सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुभाष घोरपडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ऑनलाईन शोकसभा घेऊन घोरपडे यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऑनलाईन हजर होते.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या शोकसभेला प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, प्रदेश कोअर कमिटी अध्यक्ष कैलासभाऊ खंदारे, जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट, अरुण बोरुडे, संतोष शिंदे, प्रवीण ससाणे, नवनाथ शिंदे, विशाल साळवे, लहू लोंढे, पोपट फुले, संजय खुडे, भागचंद नवगिरे, उत्तम रोकडे आदी उपस्थित होते.
विष्णूभाऊ कसबे म्हणाले की, सर्वसामान्य, वंचित व दुर्बल घटकांसाठी कार्य करणारा कार्यकर्ता हरपला आहे. सुभाष घोरपडे यांच्या निधनाने संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात उत्तम पध्दतीने संघटन करुन सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य केले. संघटनेचे निष्ठावान पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मातंग समाजाचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान न विसरता येणारे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागातून आलेल्या घोरपडे यांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाणीव होती. सर्वसामान्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्‍वासा पर्यंत त्यांनी कार्य केले. मागील कोरोनाच्या टाळेबंदीत देखील त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला. त्यांच्या निधनाने सर्वच पदाधिकार्‍यांना धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले. शोक सभेला उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करुन घोरपडे यांना श्रध्दांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here