महावीर जयंती उत्सवाविषयी मार्गदर्शक सूचना जारी

767
  • वाशिम, दि. २३ (जिमाका) : राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भावाचा अनुषंगाने सर्व सण, उत्सव हे अत्यंत साधेपणाने व लोकांनी एकत्रित न जमता करण्यात येत आहेत. त्यामुळे २५ एप्रिल २०२१ रोजी साजरा होणारा महावीर जयंती उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी म्हटले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी २० एप्रिल रोजी आदेश निर्गमित केले आहेत.
  • या आदेशात म्हटले आहे की, या वर्षी कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे महावीर जयंती उत्सव मोठ्या संख्येने एकत्रित येवून साजरी न करता, हा उत्सव साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा-अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. मंदिरामधील व्यवस्थापक अथवा विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे उपलब्ध करून द्यावी.
  • महावीर जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येवू नयेत. कोविड-१९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महावीर जयंतीच्या दिनांकापर्यंत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
  • या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here