शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यास असमर्थ ठरणाऱ्या पुणे महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय ही रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील कचरा व्यवस्थापनाची स्थिती कोलमडली आहे. कचरा जमा करणारी यंत्रणादेखील पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. ‘एमपीसीबी’ने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) सूचनेनुसार, महापालिकेला कचरा व्यवस्थापन न केल्याप्रकरणी तब्बल 80 लाखांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन हे अद्यापही पूर्ण क्षमेतेने होत नाही. याबाबत तातडीने सक्षम यंत्रणा उभारत कारवाई केली नाही, तर पुणे महानगरपालिकेला डिसेंबर 2020 पासून प्रतिमहिना दहा लाख रुपये दंड भरावा लागेल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.





