रेखा जरे हत्याकांड! कोर्टाने पोलिसांचा ‘से’ मागितला!
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठेने जिल्हा न्यायालयात
केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या शुक्रवारी (दि. ११) सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज (दि. ८) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपासी अधिकार्यांना म्हणणे मांडावयाचे आदेश दिले.
रेखा जरे यांची दि. ३० नोव्हेंबर रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली.
या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप फरारच आहे.
बोठे याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी सोमवारी ॲड. महेश तवले यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मंगळवारी न्यायालयात या अर्जावर प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने सरकारी वकील आणि पोलिसांचे म्हणणे मागितले आहे. सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानंतर यावर पुढील सुनावणी दि.११ डिसेंबर रोजी होईल.
दरम्यान, बोठेला मदत करणारे सर्वच यामध्ये अडचणीत येणार असून हे सर्व पोलिसांच्या रडारवर आहेत. बोठेने स्वत:चे मोबाईल घरी ठेवले असून तो कोणाच्या मोबाईलवरुन त्याच्या घरी संपर्क साधत आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.






