निधी न आणणाऱ्यांनी आमच्या पाठपुराव्याचे श्रेय घेऊ नये : संपत बारस्कर

निधी न आणणाऱ्यांनी आमच्या पाठपुराव्याचे श्रेय घेऊ नये : संपत बारस्कर

तपोवन रस्त्याच्या कामास नव्याने सुरुवात झाली आहे. जोपर्यंत हा रस्ता दर्जेदार आणि मजबूत होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. ज्यांनी रस्त्यासाठी काहीही केले नाही. कुठला निधीही आणला नाही, ते आज या रस्त्यावर निर्लज्जपणे फिरत असून, ही शरमेची बाब आहे. आमच्या पाठपुराव्याचे श्रेय इतरांनी घेऊ नये, असे म्हणत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला आहे. तपोवन रस्त्याच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब पवार, डॉ. सागर बोरुडे, नितीन बारस्कर, निखिल वारे, योगेश ठुबे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. बारस्कर म्हणाले की, तपोवन रस्त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करुन निधी मिळवला. त्यासाठी अनेक आंदोलनेही आम्ही केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर काही ठिकाणी हा रस्ता खराब झाल्याने आम्ही आंदोलन केले होते. त्याची दखल घेत पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पुन्हा नव्याने सुरू करण्यात येईल, असे पत्र अधिकार्‍यांनी दिले होते. आज हे काम नव्याने सुरू झाले असून, हा रस्ता दर्जेदार होत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यासाठी आंदोलन करत राहणार, आम्ही केलेल्या पाठपुराव्याचे इतर कोणीही श्रेय घेऊ नये, असे बारस्कर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here